नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असतानाच, ‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह अन्य ६ जणांविरोधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) नवा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपास पथकाच्या सूचनेनंतर ३ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

नव्या गुन्ह्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सूमन दुबे, सॅम पित्रोदा, तसेच, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड, यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचाही समावेश असल्याची माहिती रविवारी समोर आली. २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ‘ईडी’ने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू केला होता. ‘ईडी’ने सोनिया व राहुल गांधी तसेच इतर काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

आरोप काय?

सोनिया गांधी, राहुल गांधी आदींनी संगनमत करून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची मालमत्ता अवैध पद्धतीने हस्तगत केल्याचा मूळ आरोप आहे. ‘असोसिएटेड जर्नल्स’ची २ हजार कोटींची संपत्ती ‘यंग इंडिया’ने केवळ ५० लाखांमध्ये ताब्यात घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी ‘ईडी’ने आरोपपत्र दाखल केल्यानंतर ७०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासंदर्भात नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर : रमेश

राजकीय सूडभावनेतून केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. ‘मोदी-शहांनी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध छळ, धमकी आणि सूडबुद्धीचे खोडसाळ राजकारण सुरूच ठेवले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण पूर्णपणे बनावट आहे. शेवटी न्यायाचा विजय होईल. सत्यमेव जयते’, अशी टिप्पणी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरून केली. नव्या गुन्ह्यासंदर्भात, यात नवे काहीही नाही. ज्या प्रकरणामध्ये पैशांची देवाण-घेवाण झाली नाही, स्थावर मालमत्ता हस्तांतरित केली गेली नाही, तरीही तपास यंत्रणांना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा शोध लागला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते व या प्रकरणातील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली.