काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी ( ८ जून रोजी) सायंकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित काँग्रेसच्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील प्रस्ताव मल्लिकार्जून खरगे यांनी मांडला होता. या प्रस्तावाला काँग्रेसच्या खासदारांनी एकमताने मंजुरी दिली.

हेही वाचा – Lok Sabha Results : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला यश; काँग्रेसने किती जागा जिंकल्या?

यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले, “आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात काम करू. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली, यापेक्षा चांगली गोष्टी कोणतीही असू शकत नाही. अनेक आव्हांनाचा सामना करत त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे. तसेच स्वत:ला देशसेवेसाठी वाहून घेतलं आहे.”

याशिवाय काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी हा क्षण आमच्यासाठी भावूक असल्याची प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची पुन्हा एकदा निवड झाली आहे. हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “राहुल गांधी ओडिशात आले तर मी गोडसे होईल”, काँग्रेसकडून तक्रार दाखल

दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात बोलताना काँग्रेस खासदारांचे आभार मानले. “तुम्ही सर्वांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत मोठी जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत तुम्ही ही निवडणूक लढवली. अनेक अडथळे पार करत अतिशय प्रभावीपणे काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसला हे यश मिळाले आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.