सोनिया गांधी यांची मोदींना पत्राद्वारे विनंती

करोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली.

या लहानग्यांवर जे संकट ओढवले आहे त्यामधून सावरण्यास त्यांना मदत करणे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल करणे हे देशावरील दायित्व आहे. त्यामुळे करोनामुळे ज्या मुलांवरील पालकांचे छत्र हरवले आहे त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती आपल्याला पत्राद्वारे करीत असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे पत्र ट्वीट करून म्हटले आहे की, केंद्र सरकारने ही सूचना ऐकण्याची वेळ आता आली आहे. सोनिया गांधी यांनी लहान मुलांच्या भवितव्यासाठी महत्त्वाची सूचना केली आहे, असेही राहुल यांनी ट्वीट केले आहे.

भाजपची टीका

दरम्यान, भाजपने सोनिया गांधी यांच्या विनंतीवर टीका केली आहे. सोनियांनी जी सूचना केली आहे ती कालबाह्य झाली आहे.  मोदी यांना पत्र लिहिण्याऐवजी सोनिया यांनी अमरिंदरसिंग आणि अशोक गेहलोत यांना पत्र लिहावयास हवे होते, असे भाजपने म्हटले आहे.