लंडन : ‘‘काँग्रेसच्या इंग्लंडमधील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. आपल्या लंडन दौऱ्यादरम्यान ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या (आयओसी) कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी अनपेक्षितरीत्या सोनिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ‘आयओसी’च्या इंग्लंडमधील कार्यकर्त्यांची शनिवारी राहुल यांनी भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून पक्षविषयक बाबी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेतले. ‘आयओसी’चे इंग्लंडचे अध्यक्ष कमल धालिवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल यांना पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घेण्याचे आवाहन केले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या वेळी राहुल यांनी त्यांचा संपर्क दूरध्वनीवरून सोनिया गांधींशी करून देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. या वेळी सोनियांनी या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीतील विजयासाठी खूप मेहनत घेण्याचे आवाहन केले.

या वेळी ‘आयओसी’च्या तेलंगणा समूहाचे सदस्य व प्रवक्ते सुधाकर गौड व सरचिटणीस गंपा वेणुगोपाल यांनी २०१४ मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती केल्याबद्दल सोनियांचे आभार मानले. त्या वेळी सोनियांनी तेलंगणमध्ये आगामी वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले.

वैचारिक संघर्षांसाठी पक्ष सज्ज- राहुल गांधी

या वेळी राहुल गांधी यांनी भारतात वैचारिक संघर्षांसाठी पक्ष सज्ज झाल्याचा पुनरुच्चार करून, आपण कोणत्याही एका राजकीय संस्थेशी संघर्ष करत नसून, विघातक विचारधारेशी आपला संघर्ष आहे. तसेच देशातील घटनात्मक संस्थांच्या रक्षणासाठीही आपण लढत आहोत, असे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi s appeal to indian overseas congress workers zws
First published on: 23-05-2022 at 02:18 IST