Sonia Gandhi Covid Positive: सोनिया गांधी करोना पॉझिटिव्ह; दोन महिन्यात दुसऱ्यांदा झाली लागण

सोनिया गांधींची कन्या आणि काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनाही याच आठवड्यामध्ये करोनाची लागण झाल्याच्या स्पष्ट झालं आहे.

Sonia Gandhi Covid Positive: सोनिया गांधी करोना पॉझिटिव्ह; दोन महिन्यात दुसऱ्यांदा झाली लागण
जयराम रमेश यांनी दिली माहिती

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग झाला आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार जयराम रमेश यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. सोनिया गांधीची प्रकृती स्थिर असून त्यांना सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्या करोनासंदर्भातील सर्व प्रोटोकॉल्सचं पालन करत असल्याचंही रमेश यांनी म्हटलं आहे.

“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या करोना चाचणीचा निकाल सकारात्मक आला आहे. त्या सरकारी नियमांनुसार सध्या आयसोलेशनमध्ये राहतील,” असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे.

“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. आम्ही त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करतो,” असं काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलं आहे.

सोनिया गांधींना जून महिन्यामध्येही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) चौकशीला हजर राहण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सध्या ईडीकडून सोनिया यांची चौकशी सुरु आहे. त्यांना मागील वेळेस करोनाचा संसर्ग झाला होता तेव्हा करोनासंदर्भातील आरोग्य समस्यांमुळे दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले.

मागील काही काळामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये पवन खेरा, खासदार अभिषेक मनू सिंघवी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लीकार्जून खर्गे यांचा समावेश आहे. सोनिया गांधींची कन्या आणि काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनाही याच आठवड्यामध्ये करोनाची लागण झाल्याच्या स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
महिलांना मोफत बसप्रवास म्हणजे क्रांती- स्टॅलिन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी