नवी दिल्लीतील इंदिरा भवनमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ गीत सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. हा ‘वंदे मातरम’चा अपमान असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावरून भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
‘वंदे मातरम’वरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते विकास पुत्तूर यांनी रविवारी कर्नाटकातील उरवा पोलीस ठाण्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआने दिलं आहे.
कर्नाटक सरकारने या संदर्भात कारवाई न केल्यास आपण उच्च न्यायालयात दाद मागू असा इशाराही विकास पुत्तूर यांनी दिला आहे. “जर कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणि पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली नाही, तर मी कर्नाटक उच्च न्यायालयात तक्रार दाखल करेन. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे”, असं विकास पुत्तूर यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Mangaluru, Karnataka: BJP leaders lodge a formal complaint against Congress leader Sonia Gandhi at the Urwa Police Station in Karnataka.
— ANI (@ANI) August 16, 2026
The complaint follows an alleged controversy regarding her gestures during the recitation of the national song, Vande Mataram, at… pic.twitter.com/gEEPLu3ous
काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं?
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपाने केलेले हे दावे फेटाळून लावले. कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चे पूर्ण व्हर्जन गाण्यात आले होते आणि ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमातील पूर्ण ‘वंदे मातरम’ गायनाबद्दल विचारलं असता, जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितलं की, “इंदिरा भवनमध्ये ‘वंदे मातरम’चं पूर्ण व्हर्जन गाण्यात आलं आणि यात कोणताही वाद नाही. ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. काँग्रेस अध्यक्ष बऱ्याच वेळ उभे असल्याने, सोनिया गांधी त्यांच्यासाठी खुर्ची आणण्यास सांगत होत्या”, असं स्पष्टीकरण जयराम रमेश यांनी दिलं आहे.
“…तर माफी मागा”; अमित शाहांची काँग्रेसवर टीका
“त्यांची (काँग्रेसची) निर्लज्जपणाची हद्द पाहा. काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम’ गायलं जातं होतं. त्यादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांना ‘वंदे मातरम’ थांबवण्यास सांगितलं. हे आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलं. सोनिया गांधींजी १४० कोटी जनता तुम्हाला पाहत आहे. तुम्ही केलेलं हे पाप देशातील जनता कधीही माफ करणार नाही. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगाण अर्धवट सोडण्याचा विचार कोणी कसं करू शकतं? काँग्रेसच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर दोन्ही हात जोडून काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
