हरियाणामधील सोनीपतमध्ये नातेसंबंधांचं वास्तव दाखवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी देखील मुलींना वेळ मिळाला नाही. एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर चक्क त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहिला नाही. त्यामुळे अखेर वृद्धाश्रम चालवणाऱ्या व्यक्तीनेच अंत्यविधी केला, तेव्हा मुलींनी व्हिडीओ कॉलवरून वडिलांचा अंत्यविधी पाहिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

सोनीपतमध्ये एक अतिशय भावूक करणारी घटना घडली. एका वृद्ध व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना आधार देण्यात घालवलं. पण तरीही त्या व्यक्तीचं वृद्धाश्रमात निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीसाठी तीन मुलींपैकी एकही मुलगी उपस्थित राहिली नाही. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व्यापारी असलेले शिवचरण हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांना आपल्या मुलींना शेवटच्या वेळी भेटण्याची इच्छा होती. त्यांच्या मृत्यूची सूचना देऊन देखील त्यांच्या तिन्ही मुलींपैकी कोणीही वृद्धाश्रमात आलं नाही किंवा अंत्यविधीलाही उपस्थित राहिलं नाही. अंत्यविधीला उपस्थित राहण्याऐवजी मुलींनी अंत्यविधीच्या खर्चासाठी ५ हजार १०० रुपये पाठवले आणि वडिलांचा अंत्यविधी व्हिडीओ कॉलवरून दाखवण्याची विनंती केली.

व्हायरल व्हिडीओत काय दिसत आहे?

या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वृद्धाश्रम चालवणारे काही जण त्या व्यक्तीचा अंत्यविधी करत आहेत. त्याचवेळी एकजण अंत्यविधीची प्रक्रिया सुरू असताना एक मुलगी व्हिडीओ कॉलद्वारे अंत्यविधी पाहत असल्याचं दिसत आहे.

या घटनेबद्दल बोलताना वृद्धाश्रमाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शिवचरण यांनी त्यांचे शेवटचे दिवस या आश्रमात घालवले. या वृद्ध व्यक्तीला आपल्या मुलींना भेटण्याची खूप इच्छा होती, त्या आपल्याला भेटायला येतील अशी आशा होती. मात्र, त्या आल्याच नाहीत. शिवचरण हे कापड व्यापारी होते आणि त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणावर मोठा खर्च केला होता. मात्र, जेव्हा त्यांना निरोप देण्याची वेळ आली तेव्हा त्यांचे कुटुंबीय तिथे आले नाही.

वृद्धाश्रम आणि स्थानिक रहिवाशांनी सन्मानपूर्वक अंत्यविधीची जबाबदारी पार पाडली. या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच अनेकजण शिवचरण यांच्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणांविषयीच्या परिस्थितीबद्दल दुःख व्यक्त करत आहेत.