हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. विवाह करण्याआधी पतीने स्वत:ची खरी धार्मिक ओळख आणि आधी झालेलं लग्न लपवून ठेवल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच लग्नानंतर पतीने आपला छळ केला आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोपही या महिलेने केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत या महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. दरम्यान, महिलेने केलेल्या आरोपांची दखल पोलिसांनी घेतली असून या प्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे.

प्रकरण काय?

सोनीपतमधील एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेच्या म्हणण्यांनुसार, पतीने त्याची ओळख लपवून आपली फसवणूक केली आहे. पती व त्याच्या कुटुंबीयांनी तिला धमकावून तिचा छळ केल्याचा आरोपही तिने केला. या महिलेने सांगितलं की, इन्स्टाग्रामवर आमची मैत्री झाली तेव्हा या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘जॉनी’ अशी करून दिली होती. तसेच आपण हिंदू असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि त्यानंतर आम्ही हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केला आणि पती-पत्नी म्हणून एकत्र राहू लागलो.

पण लग्नानंतर ६ महिन्यांनी तिला समजलं की पतीची खरी ओळख तिला सांगितलेल्या माहितीपेक्षा वेगळी आहे. या महिलेला त्याच्या म्हणजे पतीच्या बॅगेत ‘जावेद’ असं नाव असलेलं आधार कार्ड सापडलं. त्यानंतर तिला समजलं की, ज्या व्यक्तीला ती ‘जॉनी’ म्हणून ओळखत होती, ती प्रत्यक्षात मुस्लिम असून आधीच विवाहित होती. महिलेने असाही आरोप केला की, सोनीपतचाच रहिवासी असलेल्या या जावेदचं लग्न १२ वर्षांपूर्वी झालं होतं. तसेच पहिल्या पत्नीपासून त्याला ३ मुलेही आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या महिलेच्या म्हणण्यांनुसार, या घटनेची माहिती समजल्यानंतर तिच्या पतीची पहिली पत्नी आली आणि तिने आमच्याशी वाद घातला. आता या महिलेने आरोप केला की, तिचा पती आपल्या कुटुंबासह आठभरापासून बेपत्ता आहे. त्यामुळे तिने पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तिने आपल्या तक्रारीत असा आरोप केला की, तिला आणि तिच्या मुलांना धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे तिने पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपली खरी ओळख लपवणं, मारहाण करणं यासह आदी गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, एका संघटनेच्या एका प्रतिनिधीनेही हा मुद्दा उपस्थित केला आणि त्या महिलेच्या तक्रारीचं समर्थन केलं. पोलिसांनी सांगितलं की, त्यांना महिलेची तक्रार प्राप्त झाली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाच्या संदर्भात दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. महिलेने केलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. पुढील कारवाई पोलीस तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांवर अवलंबून असेल असं पोलिसांनी सांगितलं.