Chhattisgarh : छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील एका विद्यापीठात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या खोलीमध्ये टोकाचं पाऊल उचलत स्वत:चं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर छत्तीसगडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मृत विद्यार्थिनीचं नाव प्रिन्सी असं असून ती झारखंडच्या जमशेदपूरमधील रहिवासी होती. मात्र, इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ती छत्तीसगडच्या रायगडमध्ये राहत होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री वसतिगृहातील तिच्या खोलीत तिने गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वसतिगृह अधिकाऱ्यांना ही घटनेची कळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक चौकशी केली आणि मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, प्राथमिक माहितीनुसार, ही विद्यार्थिनी शैक्षणिक तणावात होती. कारण तिला पहिल्या वर्षाच्या बॅकलॉग पेपरसह दुसऱ्या वर्षाचीही परीक्षा द्यावी लागणार होती. तिच्या खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली असून पोलीस तिचा तपास करत आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या घटनेत वसतिगृहातील रहिवासी आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात येत आहेत. तसेच असंही सांगितलं जात आहे की, शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास तिच्या कुटुंबाने तिला वारंवार फोन केला, पण फोनला तिने काहीही रिप्लाय केला नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबाने वसतिगृहाच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यानंतर चेक केलं असता तिचा मृतदेह आढळून आला.
चिठ्ठीत काय उल्लेख केला?
पोलिसांना तिच्या खोलीमध्ये सापडलेल्या चिठ्ठीत असं आढळून आलं की, ती तिच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हती. ती तिच्या शैक्षणिक कामगिरीवर आणि कुटुंबावरील आर्थिक भारामुळे तणावात होती. तिने चिठ्ठीत म्हटलं की, “सॉरी मम्मी, पप्पा. मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही.” दरम्यान, तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की तिच्या पहिल्या सत्रात तिचे काही विषय राहिले होते. त्या विषयांची ती पुन्हा तयारी करत होती. आता पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत.
