वृत्तसंस्था, अहमदाबाद
मार्को यान्सनच्या (४/४०) भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार एडीन मार्करमच्या (४४ चेंडूंत नाबाद ८६) आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर सरस दक्षिण आफ्रिका संघाने शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करताना ‘ड’ गटातील वर्चस्वाच्या लढाईत बाजी मारली.
न्यूझीलंडला टिम सेफर्ट (१३), रचिन रवींद्र (१३), ग्लेन फिलिप्स (१) लवकर बाद झाल्यानंतरही फिन ॲलन, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल यांच्या आक्रमक पवित्र्याने वेगवान वाटचाल केली होती. सोळाव्या षटकापर्यंत त्यांच्या डावाची गती नऊच्या आसपास राहिली होती. अर्थात, ॲलन (१७ चेंडूत ३१) आणि चॅपमन (२६ चेंडूत ४८) यांनी सुरुवातीला दहापेक्षा अधिक गती राखल्यामुळे त्यांना हे शक्य झाले. यान्सन आणि बॉश यांनी अखेरच्या चार षटकांत केलेली गोलंदाजी निर्णायक ठरली. अखेरच्या चार षटकांत त्यांना ३७ धावाच करत आल्या. चौदाव्या षटकातील ५ बाद १३८ अशा स्थितीतून त्यांचा डाव २० षटकांत ७ बाद १७५ असा मर्यादित राहिला.
आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉक पेक्षा मार्करम वेगळ्याच लयीत दिसला. त्याच्या आक्रमकतेने दक्षिण आफ्रिकेचा डाव चढत्या वेगानेच सुरू राहिला. पहिल्या पाच षटकांत १ बाद ६२, नंतर डावाच्या मध्यात २ बाद १२० अशा तुफान वेगाने मार्करमने सहकाऱ्यांना साथीला घेत संघाचा विजय सुकर केला. अठराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिलरने षटकार ठोकत दक्षिण आफ्रिकेचा विजय साकार केला. दक्षिण आफ्रिकेने १७.१ षटकांत ७ बाद १७८ धावा केल्या. मिलर २४ धावांवर नाबाद राहिला. मार्करमने आपल्या खेळीत आठ चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली.

