दक्षिण दिल्लीमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी वसंत कुंज येथे एका चर्चची मोडतोड करण्यात आली. गेल्या नोव्हेंबरपासून चर्चची मोडतोड करण्याची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेबाबत अहवाल मागवला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सेंट अल्फोन्सा चर्च येथे पहाटे १ च्या सुमारास ही घटना घडली व त्या प्रकरणी दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक पवित्र वस्तूंची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केली.
आम्ही या घटनेची चौकशी करीत आहोत व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चच्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. प्रथम या प्रकरणामागची कारणे काय असावीत याबाबत शोध घेतला जाईल. चर्चचे धर्मगुरू फादर व्हिन्सेंट साल्वातोर यांनी असा दावा केला की, हा चोरी किंवा दरोडय़ाचा प्रकार नव्हता.
सातत्याने मोडतोड
 चर्चचे पावित्र्यभंग करण्याचा हा प्रकार असून गेली काही महिने असे प्रकार घडत आहेत. दिलशाद गार्डन येथील सेंट सेबास्टियन चर्च व विकासपुरी नंतर जसोला येथील चर्चच्या बाबतीत अशाच घटना घडल्या होत्या.
नोव्हेंबरपासून चर्चवर हल्ला करण्याची पाचवी घटना होती. गेल्या महिन्यात विकासपुरी भागात चर्चची मोडतोड केली होती, तर डिसेंबरमध्ये दिलशाद गार्डन येथील सेंट सेबास्टियन चर्च आगीत जळाले होते, ख्रिश्चन समाजाने त्यातही काळेबेरे असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तपास सुरू आहे.