दक्षिण दिल्लीतील रतिया मार्ग परिसरात एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ही घटना घरात घुसलेल्या चोरट्यांनी केलेल्या हत्येसारखी वाटत होती. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा तपास पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पत्नी मंजू (वय ४५), तिचा २० वर्षीय प्रियकर चमन आणि आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या किशनला अटक केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला पती
१० ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता रतिया मार्ग परिसरात मुन्ना लाल यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळला. मुन्ना लाल हे बांधकाम व्यावसायिक होते. गुन्हा घडल्यानंतर त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त होते. ड्रॉवर उघडे होते आणि कपडे जमिनीवर पसरलेले होते. त्यामुळे सुरुवातीला घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांनी लाल यांची हत्या केल्याचा संशय होता. लाल यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पत्नीच्या साक्षीवर पोलिसांना संशय
लाल यांच्या पत्नी मंजूने पोलिसांना सांगितले की, सकाळी तिला पतीचा मृतदेह आढळला आणि चोरटे टेरेसच्या मार्गाने घरात शिरले असावेत असा संशय तिने व्यक्त केला. मात्र घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. घरातील पसारा हा लुटीचा बनाव करण्यासाठी मुद्दाम तयार करण्यात आला असावा असा संशय तपास अधिकाऱ्यांना आला.
आधी गुंगीचे औषध, नंतर मारहाण
फॉरेन्सिक तपासात लाल यांना आधी गुंगीचे औषध देण्यात आल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लाल यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर बोथड वस्तूने वार करण्यात आले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आली. याशिवाय त्यांच्या शरीराच्या गुप्तांगांवर विजेचा धक्का दिल्याचेही तपासात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न
घराच्या काही भागातील फरशीवर अस्पष्ट रेषा आढळल्या. एखाद्याने घाईघाईने रक्ताचे डाग आणि इतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पहाटे सुमारे पावणे दोन वाजता एक मुखवटा घातलेली व्यक्ती घरात जाताना आणि सुमारे सव्वातीन वाजता बाहेर पडताना दिसली. याच काळात घराबाहेर एक महिला आणि तिच्या साथीदाराच्या संशयास्पद हालचालीही सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्नीचे प्रियकराबरोबर संबंध असल्याचा आरोप
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंजूचे चमनबरोबर विवाहबाह्य संबंध होते. तिचे पतीबरोबरचे वैवाहिक जीवनही तणावपूर्ण होते. पतीने पैसे मुक्तपणे खर्च करण्यास नकार दिला होता त्यामुळे ती नाराज होती असा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी आरोप केला आहे की, मंजूने पतीची हत्या करण्यासाठी चमनला ५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हत्या झाल्यानंतर त्याच्याबरोबर राहण्याची तिची योजना असल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जेवणात गुंगीच्या गोळ्या दिल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, ९ ऑगस्टच्या रात्री मंजूने चमनकडून मिळालेल्या झोपेच्या गोळ्या पतीच्या जेवणात मिसळल्या. लाल बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनी कथितपणे त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना विजेचे धक्के देण्यात आले आणि लाकडी दांड्याने डोक्यावर वार करण्यात आले. अखेर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मंजूने चमनला २० हजार रुपये दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हत्या केल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. कपडे आणि वस्तू इकडे-तिकडे फेकण्यात आल्या आणि ड्रॉवर उघडण्यात आले, जेणेकरून घरात चोरी झाली आणि चोरट्यांनी लाल यांची हत्या केली असा आभास निर्माण होईल. मात्र फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीतून पोलिसांनी कथित कटाचा उलगडा केला.
तिघांना अटक
या हत्येचा तपास करण्यासाठी सह पोलीस आयुक्त विजय कुमार आणि पोलीस उपायुक्त अनंत मित्तल यांच्या देखरेखीखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी मंजू आणि चमन यांच्यासह किशन याला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत १५ हजार रुपये जप्त केल्याचे अनंत मित्तल यांनी सांगितले.
