Delhi Satya Niketan Building Collapse Rescue Operation : दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली. कोसळलेल्या इमारतीखाली लोक अडकले गेले होते. अशा परिस्थितीत एका विद्यार्थ्याने शूट केलेल्या अवघ्या ११ सेकंदांच्या व्हिडिओमुळे अनेकजण घटनास्थळी पोहोचले. व्हिडिओमध्ये अडकलेल्या तरुणाचा थेट चेहरा दिसत नसला, तरी तो जिवंत असल्याचे स्पष्ट झाले होते. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
‘तो अडकला आहे, जिवंत आहे… त्याला बाहेर काढा’
सोनिपतमधील एका विद्यापीठाशी संबंधित एनएसयूआय नेते आदि नैन यांना दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर हा व्हिडिओ मिळाला. दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी नेत्याने त्यांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले होते. नैन यांच्या माहितीनुसार, व्हिडिओ शूट करणारा तरुण दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसमधील बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. तो आपल्या पीजीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकला होता. हा व्हिडिओ माजी डीयूएसयू उपाध्यक्ष अभि धैया यांच्यापर्यंतही पोहोचला होता. त्यांचा भाऊ दिशांत यांना हा व्हिडिओ मिळाला होता. अडकलेल्या विद्यार्थ्याच्या मदतीसाठी आलेल्या संदेशात, ‘तो आत अडकला आहे, जिवंत आहे, कृपया त्याला बाहेर काढा’, असे सांगण्यात आले होते.
व्हिडीओमुळे मिळाली मदत
व्हिडिओमध्ये तरुण नेमका कुठे अडकला आहे, याचा अंदाज येत नसल्याने तो पुढे घटनास्थळी असलेल्या लोकांना पाठवण्यात आला. दरम्यान, हा व्हिडिओ अनेक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये वेगाने पसरला आणि विद्यार्थ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. दिल्लीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा सांगितले की, व्हिडिओतील तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याची ओळख आदित्य अशी पटली आहे. तो आत्माराम सनातन धर्म महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे समोर आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फक्त एक विद्यार्थी नव्हे, अनेकजण बेपत्ता
इमारत कोसळल्यानंतर आसपासच्या महाविद्यालयांच्या आणि विद्यार्थी संघटनांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर बेपत्ता विद्यार्थ्यांची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर होऊ लागली. परिसरातील पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे गट तयार करून ढिगाऱ्यात अडकलेल्या परिचितांचा शोध सुरू केला. बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्यातून लाल रंगाची बॅग, पाण्याची बादली आणि खुर्च्यांसारख्या वस्तूही बाहेर काढण्यात आल्या.
‘माझ्या वर्गातील अनेक विद्यार्थी आत अडकले आहेत’
मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये मानसशास्त्राचे शिक्षण घेणारा १८ वर्षीय पीयूष शर्मा घटनास्थळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावरील पीजीमध्ये झोपला होता. इमारत कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला. “मी नुकताच जयपूरहून येथे आलो होतो. या इमारतीसमोरून मी रोज जायचो. सुरुवातीला घडलेला प्रकार खरा आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या वर्गातील अनेक विद्यार्थी या इमारतीत अडकले आहेत,” असे त्याने सांगितले. यानंतर पीयूषने आपल्या वर्गाचा व्हॉट्सॲप ग्रुप उघडला. त्यात एका विद्यार्थ्याबाबत संदेश होता. तो दुपारी दीडच्या सुमारास मित्रासोबत फोनवर बोलत होता, मात्र अचानक त्याचा आवाज बंद झाला आणि त्यानंतर तो सुरक्षित आहे की नाही, याची कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
इमारत कोसळण्याच्या या दुर्घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच, एका छोट्याशा व्हिडिओने मात्र अनोळखी विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी अनेकांना एकत्र आणले.
पाच अधिकाऱ्यांचे निलंबन
सत्य निकेतन परिसरात झालेली इमारत दुर्घटना आणि त्यात सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्ली महानगरपालिकेने प्रशासकीय पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पालिकेने आपल्या दक्षिण विभागातील तब्बल पाच अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार निलंबन कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये दक्षिण विभागाचे उपायुक्त राकेश कुमार, अधीक्षक अभियंता रणवीर सिंग, इमारत विभागाचे कार्यकारी अभियंता ललित कुमार गोयल, इमारत विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील चौहान आणि इमारत विभागाचे कनिष्ठ अभियंता आशिष कुमार यांचा समावेश आहे.
