पीटीआय, नवी दिल्ली

देशातील कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी देशाच्या अतिदक्षिणेकडे असलेल्या निकोबार बेटांवर आगमन केले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मेपर्यंत केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेने बेजार झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे.

यंदा ‘एल निनो’चा प्रभाव कमी होऊन ‘ला निना’ ही वातावरणीय स्थिती अधिक प्रभावी ठरणार आहे. याचा परिणाम देशातील पावसावर होणार असून त्यामुळे यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून तो ऑगस्ट-सप्टेंबपर्यंत टिकेल, असा अंदाज हवामान विभागाने गेल्या महिन्यात वर्तवला होता. देशातील अनेक भागांत सध्या उष्णतेची तीव्र लाट असून, काही ठिकाणी कमाल तापमान ४८ अंशांच्या घरात गेले आहे. दक्षिण भारतातही एप्रिलमध्ये उष्णतेची लाट होती. तापमानाने अनेक राज्यांमधील विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. अतिउष्णतेमुळे वीजनिर्मितीवरही ताण पडत असून, जलस्रोतही कोरडे पडत आहेत. यामुळे देशाच्या काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मोसमी वारे सक्रिय असल्यामुळे यंदा यातून लवकरच दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा >>>राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेला न जाणं काँग्रेसची चूक होती? प्रियांका गांधी म्हणाल्या, “भाजपाने आम्हाला…”

‘ला निना’ या वातावरणीय परिस्थितीमुळे मोसमी वाऱ्यांनी जोरदार आगेकूच सुरू ठेवली आहे. ३१ मेपर्यंत देशाच्या मुख्य भूमीवर पाऊस पोहोचेल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात कधी?

’देशातील निव्वळ लागवडीखालील ५२ टक्के शेती ही खरिपाची असते. पाऊस लवकर आणि चांगला आला, तर ही शेती बहरते.

’हवामान विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या तारखांमध्ये गेल्या १५० वर्षांत मोठे बदल झाले आहेत.

’ २०२०पासून गेली चार वर्षे अनुक्रमे १ जून, ३ जून, २९ मे आणि ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला होता.

’केरळमधून साधारणत: आठवडय़ाभराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोसमी पाऊस राज्यात प्रवेश करतो. त्यानुसार ७ किंवा ८ जूनपर्यंत मान्सून राज्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे.