मुंबईत ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) शताब्दी कार्यक्रम पार पडला. यामध्ये बॉलिवूड स्टार सलमान खान यानेही उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अबू आझमी सलमानच्या उपस्थितीवर भाष्य केले आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी त्याच्यावर दबाव होता, असा दावा आझमी यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या सूचना नाकारण्याचे धाडस त्याच्यामध्ये नव्हते, असंही ते म्हणाले.

सलमानमध्ये नकार देण्याची हिंमत नव्हती

“सलमान खान एक अभिनेता आहे. त्याला देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. जर सत्तेतील पक्ष त्याला काही करण्यास सांगत असतील तर मला वाटत नाही सलमानमध्ये नकार देण्याची हिंमत आहे. त्याला सरकारी दबावाखाली त्या कार्यक्रमाला जावे लागले असेल”, असं आमदार अबू आझमी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शनिवारी (ता. ७) मुंबईत झालेल्या “संघ प्रवासाची १०० वर्षे: नवीन क्षितिजे” या विषयावरील दोन दिवसांच्या व्याख्यानमालेला सलमान खानने हजेरी लावली होती. ‘आरएसएस’च्या या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर आझमी यांनी वक्तव्य केले आहे. ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी ‘आरएसएस’चा दोन दिवसांचा हा शताब्दी सोहळा मुंबईत पार पडला.

“आमंत्रण नसणाऱ्यांचा आक्षेप”

तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आरएसएसच्या कार्यक्रमावर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. “ज्यांना आमंत्रण मिळाले नाही, तेच या कार्यक्रमावर आक्षेप घेत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले?

“ज्यांना आमंत्रण मिळाले नाही त्यांनी टीका केल्यामुळे वाईट वाटते. समाजातील विविध घटकांतील लोकांच्या मनात ‘आरएसएस’बद्दल असलेले प्रश्न दूर करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी अनेकांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचा संघाशी कोणताही संबंध नाही. मात्र, संघाने त्यांना दोन दिवस मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली. संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची कोणाला पर्वा आहे?” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटले आहे की, लोक प्रेमापोटी नव्हे तर नरेंद्र मोदी सरकारच्या भीतीमुळे मुंबईत शताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते.

“या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !…”, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली होती.