Spain Bans US Military Planes in Iran War conflict asserting the war is illegal and unjust : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्पेनने अमेरिका आणि इराणच्या विरोधात भूमिका घेतली आहे. स्पेनने इराण युद्धात सहभागी असलेल्या अमेरिकेच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गरिटा रोब्लेस यांनी सोमवारी याबद्दल माहिती दिली आहे.
स्पेनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, अमेरिका संयुक्तपणे ऑपरेट केल्या जाणाऱ्या लष्करी तळांचा इराणमधील संघर्षात वापर करू शकणार नाही. तसेच स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ हे या युद्धाबाबत बोलताना, ते बेकायदेशीर, बेपर्वा आणि अन्याय्य असल्याचे म्हणाले होते. त्यानंतर आता स्पेनच्या संरक्षण मंत्री रोब्लेस यांनी सोमवारी स्पेनच्या हवाई क्षेत्राचा या संघर्षात वापर करण्याबाबतही तोच तर्क लागू होतो, असे म्हणत स्पेनची भूमिका पुन्हा एकदा स्पष्टकेली आहे.
“अमेरिकन लष्कर आणि सैन्याला हे सुरुवातीपासूनच अगदी स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे इराण युद्धासंबंधीत कोणत्याही कारवाईसाठी ना आमच्या लष्करी तळांच्या वापराला परवानगी आहे, ना स्पॅनिश हवाई क्षेत्राच्या वापराला,” असे रोब्लेस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. स्पेनमधील वृत्तपत्र El Pais ने लष्कराच्या सूत्रांचा हवाला देत स्पेनची हवाई हद्द बंद केल्याचे वृत्त दिले आहे.
सांचेझ यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या सरकारकडून अमेरिका आणि इस्रायलच्या मध्यपूर्वेतील लष्करी कारवायांना युरोपातून सातत्याने विरोध दर्शवला जात आहे.
दरम्यान सांचेझ यांच्या सरकारने अमेरिकाला दक्षिण स्पेनमधील Rota आणि Morón या लष्करी तळांचा वापर करू देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनबरोबरचा व्यापार बंद करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ हे इस्रायलच्या गाझामधील युद्धावर देखील सातत्याने टीका करत आले आहेत.
“मला वाटते स्पेनची भूमिका सर्वांना माहित आहे; ती अत्यंत स्पष्ट आहे,” असे रोब्लेस म्हणाल्या. तसेच इराणमधील युद्ध हे ‘पूर्णपणे बेकायदेशीर आणि पूर्णपणे अन्याय्य’ असल्याचेही रोब्लेस म्हणाल्या.
