scorecardresearch

अभिजात भाषेच्या मागणीला सभापतींची दाद

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी बुधवारी पुन्हा संसदेत करण्यात आली.

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी बुधवारी पुन्हा संसदेत करण्यात आली. यासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याचा पुनरुच्चार काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत केला. त्यांनी मराठीतून केलेल्या मुद्देसूद भाषणाला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही मनापासून दाद दिली. ‘‘धन्यवाद.. अभिनंदन.. आपण खूप चांगले बोललात!’’, असे नायडू म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी जानेवारीच्या अखेरीस दिल्लीत येऊन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केंद्राने तत्त्वत: मान्य केल्याची माहिती रेड्डींनी दिली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘‘अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात रंगनाथ पठारे समितीच्या अहवालाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी लोकसभेत मान्यताही दिली होती. अभिजात भाषेसाठी आवश्यक निकषांची सर्व प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलेली आहे.. आपण (व्यंकय्या नायडू) अनेक भाषांचा अभ्यास करता, आपण ज्ञानी आहात, आपले वजन वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला सूचना करावी व मराठीला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करावेत’’, अशी विनंती रजनी पाटील यांनी व्यंकय्या नायडू यांना केली.

अनेक जाती-धर्माचे लोक मराठी बोलतात. अनेक पंथ, प्रांत, संस्कृतींना मराठीने सामावून घेतलेले आहे. खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींच्या भावना फादर स्टीफन्स यांच्या शब्दांत मांडता येतील. त्यांनी १५ व्या शतकामध्ये म्हटले होते, भाषा माझी भाषा साजरी अशी मराठी.. मराठी ही ज्ञानभाषा आहे, ती कष्टकऱ्यांची भाषा आहे, ती धर्मभाषा आहे. ती श्रमाची आणि घामाची भाषा आहे. ती अजरामर आहे, ‘‘परि अमृतातेहि पैजासी जिंके’’ अशी ही भाषा आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, असा मुद्दा पाटील मांडला.

राज्य सरकारच्या विनंतीची आठवण

केंद्र सरकारने १५ वर्षांपूर्वी तमिळला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर कन्नड, मल्याळम, ओडियालाही दिला गेला. बोलीभाषांची विविधता हे मराठी भाषेचे वैभव असून मराठीमध्ये ५२ बोलीभाषा आहेत. अनेक साहित्यिकांनी, संतांनी, कवींनी मराठी समृद्ध केली आहे. प्राचीनता, श्रेष्ठता, सलगता, स्वयंभूपणा या चारही निकषांवर मराठी भाषा खरी उतरलेली आहे. २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन असतो, हा दिवस राज्यात मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. गौरवदिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केंद्र सरकारने करावी, अशी विनंती राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती, याची आठवण रजनी पाटील यांनी केंद्र सरकारला करून दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Speakers appreciate demand classical language parliament status classical language ysh

ताज्या बातम्या