निष्कलंक सुटकेचा ट्रम्प यांना विश्वास

ट्रम्प प्रचार-रशिया लागेबांधे प्रकरण

donald-trump

ट्रम्प प्रचार-रशिया लागेबांधे प्रकरण

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करणाऱ्या चमूचे रशियाशी संबंध होते का, त्याचा तपास करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असली तरी अशा प्रकारचे कोणतेही संबंध नसल्याचे सखोल चौकशीतून निष्पन्न होईल, असा विष्टद्धr(२२४)वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

एफबीआयचे माजी प्रमुख रॉबर्ट म्युएलर यांची अमेरिकेच्या विधि विभागाने या बाबत तपास करण्यासाठी बुधवारी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली. गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप होता का, याचा तपास म्युएलर करणार आहेत. या प्रकरणाच्या तपासातून आम्हाला जे यापूर्वीच माहिती आहे तेच सिद्ध होईल, असे आपण अनेकदा स्पष्ट केले आहे, आपला प्रचार आणि रशियाचा अथवा अन्य परकीय शक्तींचा काहीही संबंध नाही, त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर संपेल याची प्रतीक्षा करीत आहोत, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यानच्या काळात आपला जनतेसाठी आणि देशाच्या भवितव्याशी जोडलेल्या प्रश्नांवर सुरू असलेला लढा थांबणार नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डेप्युटी अॅटर्नी जनरल रॉड रोझेनस्टेइन यांनी म्हटले आहे की, प्रभारी अॅटर्नी जनरल या नात्याने आपण जनतेचे हित जपण्यासाठी अधिकारांचा वापर केला आणि विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली. विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा आपला निर्णय म्हणजे गुन्हा घडला असल्याचा निष्कर्ष नाही, असेही ते म्हणाले.

लिबरमॅन एफबीआयचे नवे संचालक?

अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो लिबरमॅन यांची एफबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे सरकारने ठरविले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लिबरमॅन यांची या पदासाठी मुलाखत घेणार आहेत. एफबीआयच्या संचालकपदासाठी ट्रम्प उमेदवारांच्या भेटीगाठी घेणे सुरू ठेवणार आहेत. अॅण्डु मॅककॅबे, फ्रॅन्क किटिंग, रिचर्ड मॅकफिली हे अन्य तीन उमेदवार आहेत.

विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

त्यापूर्वी अमेरिकेत २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने केलेला हस्तक्षेप आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चमूशी रशियाचे लागेबांधे असण्याची शक्यता या बाबत तपास करण्यासाठी अमेरिकेच्या विधि विभागाने एफबीआयच्या माजी प्रमुखांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. एफबीआयचे प्रमुख जेम्स कॉमी यांची हकालपट्टी करून ट्रम्प यांनी राजकीयदृष्टय़ा स्फोटक ठरणाऱ्या प्रकरणाच्या चौकशीला खीळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी कॉमी यांना माजी सहकाऱ्याची चौकशी सोडून देण्यास सांगितल्याचाही आरोप आहे. अमेरिकेत ९/११च्या हल्ल्यानंतर एफबीआयची जवळपास दशकभर धुरा सांभाळणारे रॉबर्ट म्युएलर यांची बुधवारी डेप्युटी अॅटर्नी जनरल रॉड रोझेनस्टेइन यांनी या तपासासाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती केली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर रशियाने प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का आणि त्याच्याशी संबंधित अन्य प्रकरणांचा म्युएलर तपास करणार आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Special counsel appointed for donald trump and russia inquiry