Jhansi to Prayagraj Train Attacked: १४४ वर्षांतून एकदाच येणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे जाण्यास इच्छुक आहेत. यासाठी रेल्वेनेही विशेष ट्रेन सोडलेल्या आहेत. झाशीहून प्रयागराजकडे निघालेल्या विशेष रेल्वेवर जमावाकडून दगडफेक आणि हल्ला झाल्याची माहिती आता समोर येत आहे. काही समाजकंटकांनी ट्रेनवर हल्ला करत खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि दगडफेक केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. झाशीच्या पुढे असलेल्या हरपालपूर स्थानकावर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशी दहशतीखाली आले.

दगडफेकीचे कारण काय?

झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या क्र. ११८०१ या ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. हरपालपूर रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मात्र विशेष ट्रेनच्या आत उपस्थित असलेल्या प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत. यामुळे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत दगडफेक करत तोडफोड सुरू केली. यामुळे ट्रेनच्या आत बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

तोंडावर फडका बांधलेल्या समाजकंटकाकडून तोडफोड

ट्रेनच्या आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनी सांगितले की, हरपालपूर स्थानकावर ट्रेन पोहोचताच तेथील लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे ट्रेनमधील बसलेल्या काही लोकांना दुखापत झाली. हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर फडका गुंडाळला होता. असे ८ ते १० हल्लेखोर असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू

काल रात्री ८ वाजता ही ट्रेन झाशीहून निघाली होती. रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास हरपालपूर स्थानकावर काही समाजकंटकांनी ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र आतील प्रवाशांनी वेळीच दरवाजे आतून बंद केले, अशी माहिती काही प्रवाशांनी व्हिडीओद्वारे दिली आहे. पोलिसांनी याआधारे आता चौकशी सुरू केली आहे.

छत्रपूर रेल्वे स्थानकावरही अशाचप्रकारची घटना घडली आहे. हरपालपूरप्रमाणेच छत्रपूर स्थानकावरही प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. सीव्हील लाईन्स पोलीस ठाण्याचे प्रमुख वाल्मिकी दुबे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांनी आतून दरवाजे बंद करून घेतल्यामुळे स्थानकात गोंधळ निर्माण झाला. केवळ एका माणसाने दगडफेक करून तिथून पळ काढला.

Story img Loader