दिल्ली विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या २ विमानांना तब्बल २४ तासांचा विलंब झाल्यामुळे स्पाइसजेटच्या प्रवाशांनी दिल्ली विमानतळावर ठिय्या आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. दुबईला जाणाऱ्या दोन विमानांना विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. काही प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट विमानतळावरच ठिय्या आंदोलन करत कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे दिल्ली विमानतळावर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
विमानांना विलंब का झाला?
दिल्लीवरून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या दोन विमानांना ‘ऑपरेशनल’ कारणांमुळे २४ तासांहून अधिक काळ विलंब झाला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या आंदोलन करत ‘स्पाइसजेट चोर आहे’, ‘स्पाइसजेट हाय-हाय’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने काय म्हटलं?
एका विमानाचं उड्डाण थांबवावं लागल्यामुळे आणि इतर ऑपरेशनल कारणांमुळे एसजी ५१११ आणि एसजी ५१५० या विमानांना विलंब झाला. मात्र, या प्रवाशांसाठी आता पर्यायी विमानांची व्यवस्था केली जात आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एसजी ५१११ हे विमान सोमवारी सकाळी ७:४५ वाजता उड्डाण करणार होतं. मात्र, त्याची वेळ बदलून मंगळवारी सकाळी ९ वाजता करण्यात आली. तसेच सोमवारी सायंकाळी ६:४५ वाजता सुटणारे एसजी ५१५० हे दुसरे विमान मंगळवारी दुपारी १२:३० वाजताच्या वेळेवर पुनर्निर्धारित करण्यात आलं होतं.
Two Dubai-Bound SpiceJet Flights Stuck Over a Day; Angry Flyers Protest at IGI
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 15, 2026
New Delhi – Angry SpiceJet passengers staged a sit-in at Delhi airport after two Dubai-bound flights were delayed by more than 24 hours. One flight was due to leave yesterday morning and had still not… pic.twitter.com/vqe2moYuJr
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांमधील प्रवासी विमानतळावरच अडकून पडले होते. उड्डाणाची वेळ आणि अन्न आणि निवाऱ्याबाबतची मागणी करत या प्रवाशांनी सोमवारी आणि मंगळवारीही ठिय्या आंदोलन केलं. यावेळी बराच वेळ प्रवाशांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी स्पाईसजेटचा एकही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता असाही आरोप प्रवाशांनी केला. मात्र, त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत प्रवाशांना अन्न व पाण्याची व्यवस्था करत विश्रांतीसाठी जागेची व्यवस्था करून दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडीओत काय दिसत आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संतप्त प्रवासी विमानतळावर निदर्शने करताना दिसत आहेत. त्यातील काही संतप्त झालेले प्रवासी स्पाइसजेटच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. ‘स्पाइसजेट चोर आहे’, ‘स्पाइसजेट हाय-हाय’ अशा घोषणा प्रवासी देत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
विलंबाबाबत स्पाइसजेटने काय सांगितलं?
विमानाला झालेल्या विलंबाबाबत स्पाइसजेटने एका निवेदनात सांगितलं की, एका विमानाचं उड्डाण थांबवल्यामुळे उद्भवलेल्या ऑपरेशनल कारणांमुळे दोन्ही विमानांच्या उड्डाणास विलंब झाला. या व्यत्ययाबद्दल दिलगिरी व्यक्त करताना विमान कंपनीने म्हटलं की, “प्रवाशांची जी गैरसोय झाली, त्याबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो.”
