एपी, वेस्ट पाम बीच

वेगळ्या प्रकारच्या जाहिराती आणि तिकीट दरांमध्ये मोठी सवलत यांच्या आधारे अमेरिकेच्या हवाई वाहतूक सेवेला धक्का देणाऱ्या स्पिरीट एअरलाइन्स या विमानकंपनीने व्यवसाय थांबवत असल्याचे शनिवारी जाहीर केले. ही कंपनी ३४ वर्षांपासून हवाई वाहतूक क्षेत्रात होती. दररोज शेकडो उड्डाणे, पिवळीधमक विमाने आणि १७ हजार कर्मचारी ही या विमान कंपनीची काही वैशिष्ट्ये होती.

स्पिरीट एअरलाइन्स मुख्यतः स्वस्त तिकीट दरांमुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय होती. कंपनीने आपली सेवा तत्काळ बंद करत असल्याची घोषणा शनिवारी आपल्या संकेतस्थळावरून केली. त्यानुसार, सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, तसेच ग्राहक सेवाही तत्काळ बंद करण्यात आली. काही प्रवाशांना याची कल्पना नसल्यामुळे ते शनिवारी विमानतळावर आले, पण विमान रद्द झाल्याचे समजल्यावर त्यांना धक्का बसला. तर कर्मचाऱ्यांनाही त्यांची नोकरी गेल्याचे रात्रीतून कळवण्यात आले.

या विमान कंपनीला नुकसानातून बाहेर काढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने मदत देण्याचा विचार केला होता, पण कोणताही करार होऊ शकला नाही, अशी माहिती देण्यात आली. अमेरिकेचे वाहतूक मंत्री सीन डफी यांनी सांगितले की, स्पिरीट एअरलाइन्सने प्रवाशांना परतावा देण्यासाठी राखीव निधी ठेवला आहे. अन्य विक्रेत्याकडून तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांना त्यांच्याकडूनच परतावा दिला जाईल, असे सांगण्यात आले. “तुम्ही स्पिरीट एअरलाइन्सच्या विमानाने प्रवास करणार असाल तर विमानतळावर येऊच नका. तिथे तुम्हाला मदत करण्यासाठी कोणीही नाही,” अशा शब्दांमध्ये डफी यांनी माहिती दिली.