जून २०२२ मध्ये ४० आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं होतं. आता २०२६ च्या जून महिन्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक खासदार हे दिल्लीला पोहचल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशिरा दिल्लीला पोहचले आहेत. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हेदेखील दिल्लीला पोहचले आहेत. ठाकरेंचे खासदार फुटणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्याच. त्यात खासदार संजय राऊत यांनी सूचक पोस्ट लिहिली ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आता दिल्लीत काय घडामोडी घडणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

खासदार संजय राऊत यांची पोस्ट काय?

अपना सपना मनी मनी, महुआजी खासदारांची किंमत प्रत्येकी ५० कोटी अशी ठरली आहे.(पन्नास खोके) १५ कोटी हा फक्त अॅडव्हान्स आहे. खरंतर या लोकांची किंमत ५० हजारही नाही. त्यांना एवढी किंमत मिळते आहे कारण ते शिवसेनेत आहेत. तुमच्या पक्षातल्या लोकांना किंमत मिळाली कारण ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते. असं म्हणत महुआ मोईत्रांच्या एका पोस्टला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगरच्या चर्चा संजय राऊत यांन फेटाळल्या होत्या. तसंच चार दिवसांपूर्वीच सगळे खासदार हे उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित होते. काही थेट आले होते काही जण ऑनलाइन उपस्थित होते. कुणी मुलीची शपथ घेतली, कुणी वडिलांची, आईची शपथ घेतली. कुणी साईबाबांची शपथ घेतली आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुमच्यावरच आमची निष्ठा आहे. शिवाय कुणी कुणाला भेटलं म्हणून चर्चा का करत आहात? खासदारांनी सांगितलं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र आता १५ कोटी अॅडव्हान्स मिळाला असल्याची पोस्टही त्यांनी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांची बुधवारी सकाळी भेट घेणार आहेत. त्यानंतर सहा खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती आहे. एकूण नऊ खासदारांपैकी जर सहा खासदार फुटले तर वेगळा गट निर्माण होऊ शकतो आणि ते खासदार कायदेशीर अडचणीत येणार नाहीत असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कुठले खासदार एकनाथ शिंदेंसह जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा?

१) संजय जाधव

२) संजय देशमुख

३) नागेश पाटील आष्टीकर

४) ओमराजे निंबाळकर

५) भाऊसाहेब वाकचौरे

६) सहाव्या खासदाराचं नाव समोर नाही

Uddhav Thackeray and Eknath Shinde
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं संग्रहीत छायाचित्र

अरविंद सावंत यांनी ओम बिर्लांना काय पत्र काय दिलंय?

ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार आणि संसदीय गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना हे अधिकृत पत्र सुपूर्द केले आहे. या पत्रात पक्षाने खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत

१) एकमेव अधिकृत पक्ष म्हणून मान्यता: संसदेत केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षालाच मूळ आणि अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली जावी.
२) बंडखोर गटाला मान्यता नको: पक्षातून बाहेर पडू पाहणाऱ्या कोणत्याही आमदारांच्या, खासदारांच्या किंवा स्वतंत्र गटाला कोणतीही वेगळी ओळख, विशेष दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार मंजूर करण्यात येऊ नयेत.
३) ठाकरे गटाची बाजू ऐकून घ्यावी: जर भविष्यात एखादा गट किंवा खासदार वेगळ्या मान्यतेसाठी अध्यक्षांकडे गेला, तर ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये.

दोन दिवसांपासून खासदार फुटणार असल्याच्या चर्चा

मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार या चर्चा रंगल्या आहेत. याचं कारण उद्धव ठाकरेंनी मुंबईत खासदारांची एक बैठक बोलवली होती. त्यावेळी या बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे हे खासदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र संजय राऊत यांनी हे वृत्त नाकारले होते. शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी नाही आणि जे खासदार थेट आले नव्हते ते ऑनलाइन उपस्थित होते, सगळ्यांनीच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असं माध्यमांना सांगितलं होतं. २०२२ मध्ये शिवसेनेतले ४० आमदार फुटले होते आणि सगळ्यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. ज्यानंतर जून २०२२ ते ऑक्टोबर २०२४ असा अडीच वर्षांचा काळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. २०२३ मध्ये या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पवार पक्षही सहभागी झाला होता. महायुतीने २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या पण त्यांना महाराष्ट्रात फारसं यश मिळालं नाही. पण याच महायुतीला राज्यात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. महायुतीने २३२ जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार तर २० आमदार निवडून आले आहेत. आता ९ पैकी सहा खासदार फुटतील अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे २० पैकी १६ आमदारही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जातील अशाही चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कुणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही.