पीटीआय, कोलकाता
कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एसआरएफटीआय) आवारात रविवारी विद्यार्थी आणि उजव्या विचारसरणीच्या आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर येथे तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी तणाव निवळल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात पंचसयार पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, ग्राहक पंचायतीने इन्स्टिट्यूटचे सभागृह कार्यक्रमासाठी भाड्याने घेतले होते. सकाळी दहा वाजल्यापासून तो कार्यक्रम होता. मात्र संस्थेशी संबंध नसलेल्या लोकांना संस्थेमध्ये प्रवेश देण्यास विद्यार्थी संघटनेने विरोध केला आणि सभागृहाबाहेर निषेधाचे फलकही लावले. त्यावरून झालेल्या वादानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.
दरम्यान, या कार्यक्रमात वक्त्यांनी आपल्या भाषणात ‘शहरी नक्षल’, ‘देशद्रोही’ आणि ‘अतिरेकी’ असा विद्यार्थ्यांचा उल्लेख करत प्रक्षोभक भाषण केले. तसेच या हाणामारीनंतर स्थानिक गुंडांनी संस्थेच्या आवारात उपस्थित सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना घेरून दहशत निर्माण केली. यावेळी एका विद्यार्थिनीलाही मारहाण करण्यात आली, असा दावा विद्यार्थी संघटनेने केला. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शिक्षकालाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संघटनेचा कार्यक्रम रोखण्याबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता आणि स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र असलेले फलक फाडले आणि कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांसह सर्व लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.
‘एफटीआयआय’कडून हल्ल्याचा निषेध
पुण्याच्या फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) तील विद्यार्थी संघटनेने कोलकातातील हल्ल्याचा निषेध करत तेथील विद्यार्थी संघटनेला पाठिंबा व्यक्त केला. ‘एफटीआयआय’मध्येही जानेवारी २०२४ मध्येही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. मुळात विद्यार्थी संघटनेच्या परवानगीशिवाय चित्रपट शिक्षणाशी संबंध नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये होणे अपेक्षित नाही. मात्र तरीही प्रशासन अशा कार्यक्रमांना परस्पर परवानगी देते, अशी नाराजी विद्यार्थी संघटनेने व्यक्त केली.
