कोलंबो : श्रीलंकेतील आणखी ३ खासदारांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यामुळे, राजीनामा देण्यासाठी दबाव असलेले देशाचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांना बुधवारी आणखी एक धक्का बसला.

या महिन्याच्या सुरुवातीला २२५ सदस्यांच्या संसदेतील १५६ पैकी ३० खासदारांनी राजपक्षे यांचा पाठिंबा काढून घेतला होता. वेगळय़ा बसणाऱ्या फुटीर गटाने आपण विरोधकांसह कुठल्याही आघाडीसोबत जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. राजपक्षे कुटुंबाने सत्तेतून बाहेर पडावे आणि सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्यात यावे अशी या स्वतंत्र गटाची मागणी आहे.

इशाक रहमान व एम.एस. तौफिक या खासदारांसह आपण सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत आहोत, असे श्रीलंका मुस्लीम कौन्सिलचे (एसएलएमसी) खासदार फैझल कासीम यांनी संसदेला सांगितले. हे तीन खासदार समागी जन बालागेवा (एसजेबी) या विरोधी आघाडीचा भाग होते. ते २०२० पासून राजपक्षे यांचे मित्रपक्ष होते आणि अध्यक्षांना निरंकुश अधिकार देणाऱ्या वादग्रस्त २० ए विधेयकाच्या बाजूने त्यांनी मतदान केले होते. दरम्यान, सर्व पक्षांच्या नेत्यांनी विनंती केल्यास अध्यक्ष गोताबया राजपक्षे हे राजीनामा देण्यास तयार असल्याचे संसदेच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितल्याचे विरोधी नेते साजित प्रेमदासा यांनी बुधवारी सांगितले. मात्र, संसदेचे अध्यक्ष महिंदू यापा अबेवर्धना यांनी हा दावा नाकारल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. प्रेमदासा यांनी चुकीचा अर्थ लावल्याचे अबेवर्धना म्हणाले. तथापि, ते खोटारडे असल्याचे सांगून प्रेमदासा स्वत:च्या वक्तव्यावर ठाम राहिले.