US-Israel Iran War : गेल्या जवळपास २० दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. दररोज अमेरिका-इस्रायल हे संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ले करत आहेत, तर त्या हल्ल्यांना इराणही प्रतिहल्ले करत प्रत्युत्तर देत आहे. या युद्धात आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांच्यासह इराणच्या अनेक प्रमुख अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही हे युद्ध अद्याप थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत देखील मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता या युद्धाच्या अनुषंगाने एक मोठी माहिती समोर आली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू असतानाच श्रीलंकेने एक मोठा निर्णय घेत अमेरिकी लढाऊ विमानांना श्रीलंकेच्या हद्दीत उतरण्याची परवानगी नाकारत तटस्थतेची भूमिका घेतली आहे. अमेरिकेने लढाऊ विमाने उतरवण्याची विनंती श्रीलंकेकडे केली होती अशी माहिती आता समोर आली आहे. याबाबत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी मोठं भाष्य केलं आहे.

श्रीलंकेने काय म्हटलं?

“या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिणेकडील एका नागरी विमानतळावर दोन लष्करी विमाने तैनात करण्याच्या अमेरिकेच्या विनंतीला आम्ही नकार दिला”, असं श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या म्हणण्यानुसार, ‘अमेरिकेने जिबूतीमधील एका विमान तळावरून दोन लढाऊ विमाने श्रीलंकेच्या दक्षिण भागातील मट्टाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, २६ फेब्रुवारी रोजी सादर केलेली ही विनंती आम्ही श्रीलंकेची तटस्थता जपण्यासाठी आणि संघर्षातील कोणत्याही बाजूला पाठिंबा किंवा विरोध अशी भूमिका न घेता अमेरिकेच्या लढाऊ विमानांना प्रवेश नाकारला’, असं त्यांनी म्हटलं आहे.

इराणमधील युद्ध कधी संपेल?‎ अमेरिकेच्या संरक्षण सचिवांचं मोठं वक्तव्य

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध कधी संपणार? याबाबत सवाल विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. इराणमधील हे युद्ध कधी संपेल? याबाबत भाष्य करताना पीट हेगसेथ यांनी म्हटलं की, ‘जोपर्यंत अमेरिकेची उद्दिष्ट्ये साध्य होत नाहीत, तोपर्यंत अमेरिका आपली ही मोहीम सुरूच ठेवेल.’ तसेच अमेरिका इराणवर सर्वात मोठा हल्ला करणार असल्याचे संकेतही पीट हेगसेथ यांनी दिले आहेत.