scorecardresearch

Sri Lanka Economic Crisis: सनथ जयसूर्याने मानले पंतप्रधान मोदींचे आभार; म्हणाला, “एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे…”

“लोक आता घराबाहेर पडत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.”

Modi Sri Lanka
श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केल्या भावना (फाइल फोटो)

श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे हे कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाहीत आणि देशापुढील सध्याच्या प्रश्नांना तोंड देतील, असे त्या देशाच्या सरकारने बुधवारी सांगितले. देशात आणीबाणी लागू करण्याच्या राजपक्षे यांच्या निर्णयाचेही सरकारने समर्थन केले. देशातील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटावरून राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभर प्रचंड प्रमाणावर जाहीर निदर्शने झाल्यानंतर राजपक्षे यांनी आणीबाणी मागे घेतली आहे. मात्र श्रीलंका या संकटामध्ये असताना भारताकडून होत असणाऱ्या मदतीसंदर्भात आता तेथील अनेक मान्यवरांनी भारताचे आभार मानलेत. माजी श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्यानेही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत.

नक्की वाचा >> Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएललाही बसला मोठा फटका

परिस्थितीबद्दल काय म्हणाला?
देशातील परिस्थितीबद्दल बोलताना जयसूर्याने, “लोकांना या परिस्थितीमधून जावं लागतंय हे दुर्देवी आहे. अशापद्धतीने त्यांना जगता येणार नाही, म्हणूनच त्यांनी आंदोलनांना सुरुवात केलीय. इथे गॅसचा तुटवडा आहे तसेच अनेक तास वीजही नसते,” असं म्हटलं आहे.

मार्ग काढण्याची गरज…
जयसूर्याने याच संकटातून मार्ग शोधण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय. “लोक आता घराबाहेर पडत असून आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. संबंधित लोकांनी यासंदर्भातील समस्यांवर विचार करुन निर्णय घेतला नाही तर ही अधिक गंभीर समस्या होईल. सध्या तरी याची जबाबदारी सत्तेत असणाऱ्या सरकारची आहे,” असंही सनथ जयसूर्याने स्पष्टपणे म्हटलं आहे.

भारताचे आभार…
जयसूर्याने भारताचे आभारही मानले आहेत. “शेजारी आणि आमच्या देशासाठी एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे असणाऱ्या भारताने आम्हाला कायमच मदत केलीय. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे कायमच आभारी आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये तग धरुन राहणं आमच्यासाठी फार कठीण आहे. आम्ही या संकटामधून भारत आणि इतर देशांच्या मदतीने बाहेर येऊ अशी अपेक्षा आहे,” असं सनथ जयसुर्याने म्हटलंय.

सरकारने केलं हिंसाचार संपवण्याच आवाहन
सरकार सध्याच्या समस्येचा सामना करेल आणि अध्यक्ष पदावर निवडून आलेले असल्याने त्यांनी राजीनामा देण्याचे काहीच कारण नाही, असे मुख्य सरकारी प्रतोद मंत्री जॉन्स्टन फर्नाडो यांनी संसदेत बोलताना सांगितले. जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) हा विरोधी पक्ष देशातील हिंसाचारामागे असल्याचा दावा करून, हे ‘ठगीचे राजकारण’ चालू द्यायला नको, असे फर्नाडो म्हणाले. हिंसाचार संपवण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.

आणीबाणीचं समर्थन करताना श्रीलंकन सरकार म्हणालं…
सध्या जनतेला ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे त्यावर तोडगा काढणे सरकार सुरूच ठेवेल, असे फर्नाडो यांनी सांगितल्याचे वृत्त ‘कोलंबो पेज पोर्टल’ने दिले आहे. जनतेच्या हितासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कुठलेही कायदे स्थगित करणे, तसेच कुणालाही स्थानबद्ध करणे व मालमत्ता जप्त करण्यासह व्यापक अधिकार अध्यक्षांना देणाऱ्या आणीबाणी लागू करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाचेही सरकारने समर्थन केले. अध्यक्षांच्या कार्यालयासह इतर सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला करण्याचे प्रयत्न झाल्यानंतर आणीबाणी लागू करण्यात आल्याचे सरकारने सांगितले.

…अन् आणीबाणी मागे घेतली
आंदोलकांनी राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केल्यानंतर गेल्या आठवडय़ात त्यांनी आणीबाणी जाहीर केली होती. सुरुवातीला स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, वीज आणि दूध पावडर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईवरून सुरू झालेली ही निदर्शने आता देशभर पसरली असून, निदर्शक अध्यक्ष राजपक्षे व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या निदर्शनांचे लोण प्रचंड प्रमाणावर पसरल्यानंतर अध्यक्षांनी मंगळवारी उशिरा रात्री आणीबाणी मागे घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri lanka economic crisis sanath jayasuriya says we are grateful to the indian govt and pm modi scsg

ताज्या बातम्या