श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी शुक्रवारी स्वत:चा पराभव मान्य केला. आज सकाळापासून निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते मैथ्रीपाल सिरिसेना यांनी राजपक्षेंविरुद्ध आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर जनतेच्या या आदेशाचा आदर करत राजपक्षे यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान सोडल्याचे त्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या निवडणुकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी असले तरी, सिरिसेना तब्बल ४,००,००० मतांनी विजयी होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
तत्पूर्वी श्रीलंकेचे माजी पंतप्रधान व युनायटेड नॅशनल पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेऊन राजपक्षे यांनी देशातील सत्तांतर कोणत्याही “अडचणीशिवाय‘ व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
राजपक्षे यांच्याविरोधातील संयुक्त विरोधी पक्षाचे नेते मैथ्रीपाल सिरिसेना यांना निवडणुकपूर्व सर्वेक्षणामध्ये झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. तमिळ नागरिकांची दाट लोकसंख्या असलेल्या उत्तर श्रीलंकेमधून सिरिसेना यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्‍य मिळाले. हा सत्तापालट श्रीलंकेच्या दशकभराच्या राजकीय इतिहासातील मोठी घटना मानली जात आहे. या निवडणुकीसाठी श्रीलंकेच्या जवळपास सर्वच भागांमध्ये ६५ ते ७० टक्के मतदान झाले होते.  जाफना जिल्ह्यात सिरिसेना यांना तब्बल २,५३,५७४ मते मिळाली; तर राजपक्षे यांना अवघ्या ७४,४५४ मतांवर समाधान मानवे लागले.
सिरिसेना यांनी देशाची राजधानी असलेल्या कोलंबोमध्येही आघाडी घेतली होती. देशामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव निर्माण केलेल्या राजपक्षे यांना त्यांचे माजी सहकारी असलेल्या सिरिसेना यांच्याकडून अनपेक्षित आव्हान मिळाल्याचे मानले जात आहे.