पीटीआय, कोलंबो : चीनचे जे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात येण्यास भारताने आक्षेप घेतला होता, त्याला तेथे १६ ते २२ ऑगस्टदरम्यान विसावण्यासाठी आता श्रीलंका सरकारने परवानगी दिली आहे, असे अधिकृत सूत्रांनी शनिवारी येथे सांगितले.

  चीनचे हे संशोधनात्मक जहाज भारताच्या लगतच्या सागरी टप्प्यात थांबविण्याची परवानगी चीनला देऊ नये, असे आवाहन भारताने श्रीलंकेला केले होते. चीनचे हे ‘युआन वांग ५’ जहाज हे सागरी क्षेपणास्त्रे आणि उपग्रहांचा माग काढणारे आहे. ते ११ ऑगस्ट रोजीच हंबनटोटा बंदरात येऊन तेथे १७ ऑगस्टपर्यंत इंधन भरण्यासाठी थांबणार होते.  पण हे जहाज संरक्षणदृष्टटय़ा महत्त्वाच्या अशा दक्षिण सागरी प्रदेशात थांबविण्यास भारताने श्रीलंकेकडे आक्षेप घेतला होता. त्यामुळे नियोजित तारखेला हे जहाज हंबनटोटा बंदरात येऊ शकले नाही. भारताच्या आक्षेपामुळे या जहाजाचा हंबनटोटा बंदरात येण्याचा दौरा लांबणीवर टाकण्याची विनंती श्रीलंकेने गेल्या आठवडय़ात चीनला केली होती. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  या जहाजाला याच बंदरात येण्याची परवानगी श्रीलंकेने दिली आहे.

   हंबनटोटा बंदराच्या पूर्वेस सहाशे सागरी मैलांवर थांबलेले हे जहाज श्रीलंका सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत होते. विशेष म्हणजे या बंदराच्या उभारणीसाठी चीनने मोठय़ा प्रमाणावर कर्जपुरवठा केला आहे.

   जहाजाला परवानगी देण्याचे हे प्रकरण श्रीलंका सरकारने योग्यरित्या हाताळले नाही, अशी टीका तेथील विरोधकांनी केली आहे. हे जहाज श्रीलंकेला जाताना हेरगिरी करून भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवेल, अशी चिंता भारताने व्यक्त केली होती. चीनच्या जहाजांबाबत अशीच भूमिका याआधीही भारताने श्रीलंकेकडे मांडली होती.

भारताची भूमिका : भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी सांगितले की, श्रीलंका हा सार्वभौम देश असून ते त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेत असतात. पण भारताच्या लगतच्या प्रदेशांतील, सीमाभागांतील परिस्थिती लक्षात घेता भारत सुरक्षिततेबाबत आपले मुद्दे मांडत असतो.