वृत्तसंस्था, कोलंबो: श्रीलंकेच्या नेगोंबो या कोलंबोपासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील गावामधील तुरुंगामध्ये कैद्यांच्या प्रतिस्पर्धी गटांमध्ये संघर्ष होऊन किमान २५ जणांचा मृत्यू झाला आणि १००पेक्षा अधिक जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा संघर्ष थांबवताना तुरुंगातील सुरक्षा अधिकाऱ्यांची दमछाक झाली. काही कैदी बंदुकीच्या गोळ्यांमुळे जखमी झाल्याचे रुग्णालय संचालकांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेगोंबो तुरुंगामध्ये रविवारपासून हा संघर्ष सुरू होता. या तुरुंगात २,४००पेक्षा अधिक कैदी आहेत. श्रीलंकेच्या एखाद्या तुरुंगात अनेक वर्षांनी इतका गंभीर संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. तुरुंगामध्ये दीर्घकाळापासून असलेले, दोषी कैद्यांचा गट आणि कच्च्या कैद्यांचा दुसरा गट यांच्यातील वादातून हा प्रकार घडला. रविवारी झालेल्या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला होता आणि ३८ कैदी जखमी झाले होते. मात्र, सोमवारी सकाळी दोन्ही गटांमधील हा संघर्ष आणखी भडकला. त्यामध्ये सहा तुरुंग अधिकाऱ्यांसह २३ जण ठार झाले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक लाठ्या घेऊन आले. पोलिसांच्या व्हॅनमधून जखमी कैद्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर तुरुंगातील जागा स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कैद्यांच्या नातेवाईकांसह अनेक जण तुरुंगाबाहेर जमले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले.
