scorecardresearch

श्रीलंकेत सत्तासहभागाचा प्रस्ताव विरोधकांना अमान्य

देशातील आजवरचे सर्वात खडतर आर्थिक संकट हाताळण्यात सत्ताधारी राजपक्षे कुटुंब अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ देशभर निदर्शने करण्यात आली.

कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी त्यांचे भाऊ व अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना सोमवारी पदावरून हटवल्यानंतर; प्रस्तावित ऐक्य मंत्रिमंडळात सामील होण्याचे निमंत्रण अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी श्रीलंकेतील विरोधी पक्षांना दिले. मात्र, त्यांचे निमंत्रण हे ‘ढोंग’ असल्याचे सांगून विरोधकांनी सोमवारी ते अमान्य केले. दरम्यान, देशातील आजवरचे सर्वात खडतर आर्थिक संकट हाताळण्यात सत्ताधारी राजपक्षे कुटुंब अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ देशभर निदर्शने करण्यात आली.

आपले बंधू आणि अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांची अध्यक्षांनी सोमवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आणि देशात आजवरचे सर्वात भीषण आर्थिक संकट ओढवल्याने होत असलेल्या हालअपेष्टांमुळे लोकांच्या वाढणाऱ्या संतापाला तोंड देण्यासाठी ऐक्य मंत्रिमंडळात (युनिटी कॅबिनेट) सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी विरोधी पक्षांना दिले.

देशभर लागू करण्यात आलेली आणीबाणी व संचारबंदी यांचे उल्लंघन करून हजारो लोक सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यांवर उतरल्यानंतर रविवारी रात्री सर्व, म्हणजे २६ मंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्याची पत्रे पंतप्रधान महिंदूा राजपक्षे यांना सोपवली.

समगी जना बालवेगया (युनायटेड पीपल्स फोर्स) या सर्वात मोठय़ा विरोधी राजकीय पक्षाने अध्यक्षांचा ऐक्य मंत्रिमंडळाचा प्रसताव तात्काळ फेटाळून लावला आणि सामूहिक राजीनामे हे ‘ढोंग’ असल्याचे वर्णन केले. आपला तमिळ पीपल्स अलायन्स हा पक्ष आणि मुस्लिमांचा प्रमुख पक्ष श्रीलंका मुस्लीम काँग्रेस हे दोन्ही विरोधी पक्ष ऐक्याच्या सरकारमध्ये सामील होणार नाहीत, असे विरोधकांपैकी मानो गणेशन या तमीळ नेत्याने सांगितले.

पंतप्रधान महिंदू राजपक्षे वगळता इतर सर्व २६ मंत्र्यांनी रविवारी रात्री राजीनामा दिल्यानंतर, अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी तीन नव्या मंत्र्यांना शपथ दिली. जी.एल. पेरिस यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले असून, दिनेश गुणवर्धना हे नवे शिक्षणमंत्री असतील. जॉन्स्टन फर्नाडो यांना नवे महामार्ग मंत्री करण्यात आले आहे.

आर्थिक मदतीसाठी भारताशी वाटाघाटी 

देशातील सध्याचे परकीय चलनविषयक संकट हाताळण्यासाठी श्रीलंकेला मदत करण्याकरता भारताने आर्थिक पॅकेज द्यावे यासाठी बासिल यांनी वाटाघाटी केल्या होत्या. रविवारी रात्रीपर्यंत न्यायमंत्री असलेले अली साबरी यांना त्यांच्या जागी आणण्यात आले आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी संभाव्य ‘बेलआऊट पॅकेज’च्या संबंधात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संपर्क साधण्याकरता बासिल हे अमेरिकेला जाणार होते.

निदर्शने सुरूच

दरम्यान, देशव्यापी आणीबाणी व आठवडाअखेरची संचारबंदी जाहीर करण्यात आली असतानाही, हजारो लोकांनी देशभर रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. भीषण आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल संपूर्ण राजपक्षे कुटुंबाने राजीनामा द्यावा, अशी मागणी ते करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri lanka opposition rejects proposed unity government zws