Sri Lanka Crisis Political Crisis: श्रीलंकेमध्ये आज नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी मतदान होणार आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी १४ जुलै रोजी पदाचा राजीनामा दिल्याने नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते १४ जुलै रोजी सिंगापूरला रवाना झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळण्यात सरकारला अपयश आल्याने याविरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली आहे. आता गोताबया यांच्या जागी नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाणार असून यासंदर्भातील १० महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात…

१)
तीन उमेदवार रिंगणात असणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिंकणारा उमेदवार हा गोताबया राजपक्षेंची जागा घेईल. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसमोर कर्जाचा डोंगर असून यासंदर्भात त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चर्चा करुन, मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशातील दोन कोटी २० लाख लोक इंधन, गॅस, दुधाची पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड देत आहेत.

२)
प्राथमिक अंदाजानुसार विद्यमान पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची दावेदारी प्रबळ असल्याचं मानलं जात आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड होईपर्यंत विद्यमान पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली असून सध्या देशाचा कारभार तेच पाहत आहेत. मात्र विक्रमसिंघे हे राज्यपक्षेंचे निकटवर्तीय असल्याने आंदोलकांचा त्यांच्या नावाला विरोध आहे.

३)
आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या श्रीलंकेत मागील अनेक महिन्यांपासून आंदोलनं सुरु होती. मार्चच्या सुमारास शहरांतील रस्त्यांवर अगदी तुरळक प्रमाणात आंदोलने सुरू झालेली दिसू लागली होती. हे सारे आंदोलक मध्यम किंवा कनिष्ठ मध्यमवर्गातील होते. या आंदोलनांमुळेच राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांना देश सोडून पलायन करावं लागलं. सिंगापूरमधूनच राज्यपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

४)
राजपक्षेंच्या राजीनाम्याबरोबरच मागील दोन दशकांपासून या बेटवजा देशावर राजकीय वर्चस्व असणार्या राजपक्षे कुटुंबाची राजकीय कारकिर्द संपल्याचं मानलं जात आहे. श्रीलंकेतील राजकारणात सर्वाधिक दबदबा असणाऱ्या राजपक्षे कुटुंबातील व्यक्तीच राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानपदी होते. गोतबाया यांच्या बंधुंनी पंतप्रधान पद आणि देशाच्या अर्थमंत्री पदाचे राजीनामे मागील वर्षीच दिले होते.

५)
विक्रमसिंघे यांना राजपक्षे यांच्या एसएलपीपीचा पाठिंबा आहे. श्रीलंकन संसदेमध्ये या पक्षाचे २२५ सभासद आहेत. श्रीलंकेचे सरन्यायाधीश जयंत जयसूर्या यांनी ७३ वर्षीय विक्रमसिंघे यांना मागील आठवड्यात हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ दिली. विक्रमसिंघे यांनी कार्यवाहक राष्ट्राध्यक्षांपेक्षा संसदेला जास्त अधिकार बहाल करण्यासाठी राज्यघटनेत १९ वी दुरुस्ती करण्याचे आवाहन केले. देशात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून विक्रमसिंघे यांनी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना देशातील अराजकतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेषाधिकार दिलेत.

६)
विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या दाव्यानुसार विक्रमसिंघे यांनी आंदेलकांविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेला खासदारांचा पाठिंबा आहे. मागील अनेक महिन्यांपासून जनतेच्या आंदोलनांचा आणि रोषाचा सामना या खासदारांना करावा लागतोय. त्यामुळेच एसएलपीपीचे सर्व खासदार हे विक्रमसिंघेंच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यात आहे. तमीळचे खासदार धर्मलिंगम सिंद्धांतन यांनी एफपीशी बोलताना, “विक्रमसिंघे हे कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देणारे नेते आहेत,” असं मत व्यक्त केलंय.

७)
श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचे जाणाकार आणि राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार विक्रमसिंघे विजयी झाल्यास ते आंदोलकांविरोधात कठोर पावले उचलू शकतात. आंदोलकांकडून विक्रमसिंघेंनाही विरोध केला जात असून ते राजपक्षे यांच्या हितांचं संरक्षण करण्यास प्राधान्य देत असल्याचे आरोप केले जात आहेत.

८)
विक्रमसिंघेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असणारे प्रमुख विरोधक हे एसएलपीपीचे माजी नेते आणि माजी शिक्षणमंत्री दुलास अल्लमपेरुमा हे आहेत. पत्रकारिता क्षेत्रामधून राजकारणात आलेल्या दुलास यांना विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे. “देशात आपण पहिल्यांदाच संविधानानुसार सरकार स्थापन करु,” असा शब्द मागील आठवड्यात दुलास यांनी श्रीलंकन जनतेला दिला आहे.

९)
६३ वर्षीय दुलास यांचा विजय झाला तर ते सध्याचे विरोधीपक्ष नेते साजिथ प्रेमदासा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. प्रेमदासा यांच्या वडील १९८० साली श्रीलंकेमध्ये सत्तेत होते. त्यावेळी दुलास हे उजव्या विचारसरणीचे प्रचारक होते.

१०)
या निवडणुकीमधील तिसरे उमेदवार अनुरा दिसानायके हे आङेत. ५३ वर्षीय अनुरा हे डाव्या विचारसणीच्या पिपल्स लिब्रेशन फ्रंटचे नेते आहेत.