श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची आज(शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.

याप्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी हे देखील सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे. आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे आमचे संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भारतीय उपखंडात शांतता रहावी यासाठी सुरक्षेच्या मुद्यावर भारताबरोबर आम्ही काम करणार आहोत. तसेच, द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही बरीच चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

पंतप्रधान मोदी यांनी, निवडणुकीतील विजयाबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांचे अभिनंदन केले. तसेच, श्रीलंकेतील लोकशाहीची बळकटी आणि परिपक्वता गर्वाचा विषय आहे. आमच्यासाठी ही सन्मानाची बाब आहे की राजपक्ष यांनी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली. भारत व श्रीलंकेच्या मैत्रीचा हा पुरवा आहे, असे यावेळी म्हटले. तसेच, दोन्ही देशांची प्रगती, शांती व समृद्धीसाठी भारत सदैव श्रीलंकेबरोबर आहे. एक स्थिर, सुरक्षित श्रीलंका असणे केवळ भारतासाठी नाहीतर भारतीय उपखंडाच्या हिताची बाब आहे. भारत हा श्रीलंकेचा सर्वात जवळाचा समुद्री शेजारी आहे, दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधाचा भक्कम आधार हा दोन्ही देशांमधील ऐतिहासीक संबंध असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.