scorecardresearch

Premium

अर्थसंकटग्रस्त श्रीलंकेत अराजक; पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या घराला आग; अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांचा ताबा

आर्थिक गर्तेत गटांगळय़ा खाणाऱ्या श्रीलंकेतील हजारो संतप्त नागरिक अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्यांची मागणी करीत शनिवारी कोलंबोच्या अतिसुरक्षित फोर्ट भागातील निवासस्थानी घुसले.

sri lanka
अर्थसंकटग्रस्त श्रीलंकेत अराजक

पीटीआय, कोलंबो : आर्थिक गर्तेत गटांगळय़ा खाणाऱ्या श्रीलंकेतील हजारो संतप्त नागरिक अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्यांची मागणी करीत शनिवारी कोलंबोच्या अतिसुरक्षित फोर्ट भागातील त्यांच्या निवासस्थानी घुसले. तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या खासगी मालकीच्या घराला आग लावली. श्रीलंकेतील सरकारविरोधातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आंदोलन असून देशात अराजक माजल्याचे चित्र आहे.            

दरम्यान, नागरिकांच्या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचे कारण देत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी रात्री उशिरा राजीनामा देण्याची घोषणा केली. तर अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी आंदोलकांच्या भीतीने शुक्रवारीच घरातून पोबारा केल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले. दोन कोटी २० लाख लोकसंख्येचे श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. श्रीलंकेत तीव्र परकीय चलन टंचाई निर्माण झाली आहे. इंधन, अन्नधान्य आणि औषधांच्या आयातीवर मर्यादा आली आहे. सरकार आर्थिक संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याने गेल्या-पाच सहा महिन्यांपासून नागरिक सरकारविरोधात असंतोष व्यक्त करीत आहेत. शनिवारीही नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. अध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक कोलंबोत एकत्र आले आणि त्यांनी राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानाकडे कूच केले. पोलिसांनी उभारलेले अडथळे आंदोलकांनी उखडून टाकले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पण संतप्त निदर्शकांना अध्यक्षांच्या  निवासस्थानाकडे जाण्यापासून ते रोखू शकले नाहीत, असे एका तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांने सांगितले. आंदोलकांनी अध्यक्षांच्या घराचा ताबा घेतला. परंतु अध्यक्षांनी शुक्रवारीच अज्ञातस्थळी पोबारा केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

Sharad Pawars meeting in gondia
प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; गोंदियात लवकरच सभा, सभेनंतरच कळणार…
ajit pawar review muslim reservation ignoring bjp oppose
अजित पवार यांच्याकडून मुस्लीम आरक्षणाचा आढावा; भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष?
saudi mohammed al narendra modi g20 delhi
अन्वयार्थ : सौदी मैत्रीचे बदलते रंग..
sharad pawar house INDIA meeting
‘इंडिया’ आघाडीत महिनाभरात जागावाटप; शरद पवार – उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

निदर्शकांनी अध्यक्षांच्या घरावर ताबा मिळवल्यानंतर पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक बोलावून आंदोलनांमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर काही वेळातच त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. ‘‘सर्व नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी मी पक्षाच्या नेत्यांची सूचना स्वीकार असून पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहे, असे ट्वीट त्यांनी केले. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

मागे न हटण्याचा आंदोलकांचा निर्धार

संतप्त निदर्शक कोलंबोकडे निघाले तेव्हा त्यांची अनेक ठिकाणी पोलिसांशी तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी झटापट झाली. आंदोलकांनी रेल्वे अधिकाऱ्यांना कोलंबोला रेल्वेगाडय़ा सोडण्यास भाग पाडले. ‘व्होल कंट्री टू कोलंबो’ अशी घोषणा देत आंदोलक उपनगरांतून कोलंबोच्या फोर्ट भागात दाखल झाले. अध्यक्ष राजपक्षे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निदर्शकांचा निर्धार आहे.   

माजी क्रिकेटपटूंचा निदर्शनांना पाठिंबा

सनथ जयसूर्या, कुमार संघकारा यांसह श्रीलंकेच्या काही माजी क्रिकेटपटूंनी कोलंबोत सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी पाठिंबा दिला. ‘‘अपयशी नेत्याच्या हकालपट्टीसाठी संपूर्ण देश एकवटल्याचे दृश्य मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेले नाही, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या याने व्यक्त केली. ‘‘मी श्रीलंकेच्या नागरिकांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही लवकरच विजय साजरा करू’’, असे अर्थगर्भ ट्वीट जयसूर्याने केले आहे.

सर्वपक्षीय सरकारसाठी..

श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी शनिवारी सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी राजीनाम्याची घोषणा केली. नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. अखेर सर्व नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली.

राजपक्षे यांचा बुधवारी राजीनामा

शुक्रवारीच अज्ञातस्थळी गेलेले अध्यक्ष गोताबया राजपक्षे येत्या बुधवारी राजीनामा देणार आहेत. तशी घोषणा संसदेचे सभापती महिंदा अबेयवर्धने यांनी शनिवारी रात्री उशिरा केली. पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर अबेयवर्धने यांनी राजपक्षे यांना राजीनामा देण्याची लेखी सूचना केली होती. त्यानंतर राजपक्षे यांनी, १३ जुलैला राजीनामा देणार असल्याची माहिती कळवली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri lanka protesters strike residence preparations resignation prime minister party government ysh

First published on: 10-07-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×