पीटीआय, कोलंबो : श्रीलंकेतील राजपक्षे सरकारविरुद्ध सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) हा देशातील विरोधी पक्ष येत्या आठवडय़ात तीन दिवस मोठा ‘पब्लिक मार्च’ काढणार आहे. लोकांच्या मागण्या ऐकून न घेता विविध डावपेच वापरून सत्तेत टिकून राहण्याचा सरकार ‘दुराग्रही’ प्रयत्न करत असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे.

‘हा लढा विजयाप्रति नेण्यासाठी देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पब्लिक मार्च १७ ते १९ एप्रिल या कालावधीत काढला जाईल,’ असे जेव्हीपीचे सरचिटणीस तिल्विन सिल्व्हा यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितल्याचे वृत्त ‘दि कोलंबो पेज न्यूज’ पोर्टलने दिले. हा मार्च पश्चिम प्रांतातील कालुतरा जिल्ह्यातून १७ एप्रिलला सकाळी ९ वाजता निघणार असून, १९ एप्रिलला तो कोलंबोलो पोहोचेल.

‘या लढय़ाला एक नवी चालना देऊन त्याचे रूपांतर लोकशक्तीत करण्यास आम्ही तयार आहोत,’ असे सिल्व्हा म्हणाले. कलाकार, वकील आणि समाजाच्या सर्व स्तरांतील तज्ज्ञ या जनलढय़ात सामील झाले असून, सरकारला घरी जाण्याचे आवाहन करत आहेत. मात्र हे सरकार काहीही करून सत्तेला चिकटून राहण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशातील आजवरच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे निदर्शक गुरुवारी सहाव्या दिवशीही त्यांच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकून होते. हा लढा हळूहळू विझेल अशी सरकारला आशा आहे, मात्र त्यांनी लोकांच्या लढय़ाला कमी लेखू नये, असे सिल्व्हा यांनी सांगितले.