भारतीय वंशाचे श्रीकांत श्रीनिवासन यांची अमेरिकेच्या कोलंबिया जिल्ह्याच्या फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीश याउच्चपदी नेमणूक झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी श्रीनिवासन हे त्यांचे आवडते असल्याचे म्हटले आहे. “माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी श्रीनिवासन हे आहेत. तसेच अमेरिकन फेडरल कोर्ट ऑफ अपील्सवर पहील्या दक्षिण आशियाई वंशाच्या न्यायाधीशाची नियुक्ती झाली ही माझ्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.” असे अमेरिका राष्ट्राध्यक्ष ओबामा  व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या ‘एएपीआय’च्या कार्यक्रमात म्हणाले. त्याचबरोबर या कार्यक्रमावेळी श्रीनिवासन यांच्या मुलांशी बोलताना ओबामा यांनी श्रीनिवासन यांचे कौतुक केले.
श्रीनिवासन यांच्याबद्दल बोलत असताना ओबामांना  महाविद्यालयातील दिवस आठवले. महाविद्यालयात असताना त्यांच्या भारतीय आणि पाकिस्तानी वंशाच्या खोलीमित्रांनी आणलेले ‘खिमा’ आणि ‘डाळ’ या खाद्यपदार्थांची त्यांना आठवण झाली. ओबामा म्हणाले, “माझ्या महाविद्यालयीन वर्षात ‘खिमा’ आणि ‘डाळ’ कशी बनवावी हे भारतीय आणि पाकिस्तानी मित्रांकडून शिकलो”

गेल्या आठवड्यात  फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीशपदी  ओबामा यांनी  निवड केलेल्या श्रीनिवासन यांच्या नियुक्तीला अमेरिका सिनेट मंडळाने  मान्यता दिली.  अमेरिकेतील विविध राज्यांची मिळून एकूण १३ कोर्ट ऑफ अपील्स आहेत. त्यातील डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया या ‘सर्किट’मधील हे न्यायालय सर्वात महत्त्वाचे मानले जाते