अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला. त्यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. मात्र कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसते आहे. आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय ते सांगतो आहोत.
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय?
आपल्या हृदयाची क्रिया अचानक बंद पडते तेव्हा कार्डिअॅक अरेस्ट येतो. कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. रक्ताभिसरण बंद झाल्याने अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होतो. मेंदूला होणारा एक रक्तपुरवठाही बंद होतो आणि मृत्यू होतो. हृदयविकार नसेल तरीही कार्डिअॅक अरेस्ट येऊ शकतो.
कार्डिअॅक अरेस्ट येणाऱ्या लोकांपैकी २५ टक्के लोकांना तर कोणतीही अस्वस्थता किंवा काही लक्षणेही जाणवत नाही. बऱ्याचदा लोक उलटी होणे, अशक्तपणा, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र अचानक कार्डिअॅक अरेस्टची लक्षणेही असू शकतात. ‘फर्स्ट पोस्ट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. ही लक्षणे जरी असली तरीही कार्डिअॅक अरेस्ट अचानक येऊ शकतो. कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर ५० टक्के लोकांचा मृत्यू होतो असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
छातीत अचानक कळ येते तेव्हा हृदयविकाराचाच झटका असतो असा समज आहे. मात्र छातीत दुखणे हा कार्डिअॅक अरेस्टही असू शकतो. हृदय विकाराचा त्रास असणाऱ्यांना कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता जास्त असते.