President’s Rule TN : तमिळनाडू विधानसभेच्या निकालाने राज्याच्या राजकीय इतिहासात मोठी उलटफेर केला आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आल्याने सत्तास्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘झोहो’ कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ‘मिळालेल्या निकालातून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने स्थिर सरकार येणे कठीण आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘नंबर गेम’ आणि राजकीय पेच
तमिळनाडूत सरकार स्थापनेसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या. विजय यांनी दोन मतदारसंघांत निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेच्या १०७ जागा होतील. त्यानंतर बहुमतासाठी एकूण ११७ आमदारांचे समर्थन आवश्यक असेल. पण, तरीही टीव्हीके बहुमतापासून १० जागा दूर आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी डीएमके आघाडीला केवळ ७३ जागांवर समाधान मानावे लागले, ज्यामध्ये डीएमकेच्या ५९ जागांचा समावेश आहे. विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बहुमत सिद्ध करू, अशी टीव्हीके पक्षातील नेत्यांची इच्छा होती. परंतु, राज्यपालांनी ठेवलेल्या अटीमुळे विजय यांच्या मार्गात अनपेक्षित अडथळा आला आहे.
श्रीधर वेंबू यांचे ‘X’ वरील परखड मत
श्रीधर वेंबू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “राज्यातील सध्याची आकडेवारी पाहता कोणतेही आघाडी सरकार हे अस्थिर आणि दबावाखाली असेल. तमिळनाडूच्या जनतेला यापेक्षा चांगले शासन मिळायला हवे.” त्यांनी सुचवले की, सध्याची विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि नव्याने निवडणुका घ्याव्यात. वेंबू यांनी निवडणुकीतील भ्रष्टाचारावरही बोट ठेवले. “नव्याने निवडणुका घेताना ‘पैशाच्या बदल्यात मत’ यावर कडक अंमलबजावणी व्हावी. अशा परिस्थितीत विजय यांचा TVK पक्ष ‘सुपर मेजॉरिटी’सह सत्तेत येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप आणि आघाडीच्या समीकरणावर भाष्य
भाजपबाबत बोलताना वेंबू यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला. “भाजपने तमिळनाडूमध्ये कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे लढावे, मग शून्य जागा मिळाल्या तरी चालेल. ही भाजपसाठी राज्यात नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे,” असे त्यांनी नमूद केले.
