US PERM Green Card Ban Impact on Indian IT Professionals: अमेरिकन सरकारने ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ आणि ‘विप्रो’सह अनेक आघाडीच्या भारतीय आयटी कंपन्यांवर ‘पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम’ (पीईआरएम) प्रक्रियेअंतर्गत बंदी घातली आहे. कंपनी-प्रायोजित कायमस्वरूपी रहिवासी दर्जासाठी (ग्रीन कार्ड) ही पायरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पार्श्वभूमीवर ‘झोहो’चे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी अमेरिकेत कार्यरत असलेल्या भारतीय तंत्रज्ञांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्टारलिंकवरून मुकेश अंबानी यांना लक्ष्य करणाऱ्या एलॉन मस्क यांनाही वेम्बू यांनी प्रत्युत्तर दिले.
श्रीधर वेम्बू यांनी ‘एक्स’वर एक सविस्तर पोस्ट लिहून गेल्या काही दशकांत भारतीयांनी अमेरिकेच्या आर्थिक आणि तांत्रिक विकासात दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. “अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सामर्थ्यात भारतीयांचे मोठे योगदान राहिले आहे. मात्र तरीही आज अमेरिकेतील एका मोठ्या घटकाला आपण तिथे नको आहोत,” अशा शब्दांत वेम्बू यांनी खंत व्यक्त केली.
व्हिसावर अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांवर या निर्णयाचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करताना वेम्बू म्हणाले, “कठोर परिश्रमाने अमेरिकेत उभे केलेले आपले आयुष्य अचानक गुंडाळावे लागण्याची वेदनादायी वेळ सध्या व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांवर आली आहे.”
मात्र हीच वेळ स्वदेशी परतण्याची असल्याचे सांगत त्यांनी स्वतःचा दृष्टीकोन मांडला. “एका उज्ज्वल आणि धाडसी भविष्यासाठी या प्रसववेदना ठरोत. मायदेशी परत या, आपण मिळून भारत घडवू या!”
‘ग्रीन कार्ड’ बंदीचा तिढा काय आहे?
अमेरिकेच्या कामगार विभागाने इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल या भारतीय कंपन्यासह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब या नामांकित कंपन्यांना ‘PERM’ प्रक्रियेतून तात्पुरते निलंबित केले आहे.
PERM म्हणजे काय?
या प्रक्रियेनुसार कोणत्याही विदेशी नागरिकाला कायमस्वरूपी नोकरीवर ठेवण्यापूर्वी संबंधित पदासाठी पात्र, इच्छुक अमेरिकन कर्मचारी मिळत नाही, तसेच विदेशी नागरिकाच्या भरतीमुळे स्थानिक कामगारांच्या वेतनावर अथवा कामाच्या अटींवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, हे कंपन्यांना सिद्ध करावे लागते.
विदेशी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वास्तव्य मिळवून देण्यासाठी काही आयटी कंपन्यांनी ‘पर्म’ प्रणालीचा गैरवापर केल्याचा आरोप कामगार विभागाने केला आहे. अमेरिकेचे कामगार सचिव कीथ सॉन्डरलिंग यांनी स्पष्ट केले, “आम्ही या कंपन्यांच्या कोणत्याही नवीन अर्जांचा स्वीकार करणार नाही, तसेच प्रलंबित असलेल्या अर्जांवरही कोणतीही प्रक्रिया करणार नाही.”
एलॉन मस्क यांनाही प्रत्युत्तर
श्रीधर वेम्बू यांनी एलॉन मस्क यांच्या मुकेश अंबानीवरील टीकेलाही उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “मोदी सरकारच्या धोरणामुळे भारत कमी खर्चातील क्षेपणास्त्र निर्माण करत आहे. यामुळे स्पेसएक्सला मोठा धोका निर्माण झाला आहे. आधीच चीनच्या ईव्ही उत्पादनामुळे टेस्ला संकटात आहे.”
एलॉन मस्क विरुद्ध अंबानी, वाद काय?
उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी ‘स्टारलिंक’च्या भारतातील प्रवेशावरून वाद सुरू आहे. स्टारलिंकला भारतीय बाजारपेठेत उतरायचे आहे. मात्र त्यांच्या कंपनीला परवाना मिळत नसून तो भारतीय धनदांडगे व्यावसायिक अडवून ठेवत असल्याचा आरोप मस्क यांनी केला होता. स्टारलिंकला भारतीय बाजारपेठेत खुल्या स्पर्धेत उतरण्याची परवानगी अंबानी देणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतीय जनतेचे ‘मक्तेदारीतून होणारे शोषण’ सुरू ठेवण्याचाच अंबानींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही मस्क यांनी केला आहे.
