आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ९ भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये ८ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर खासगी असून, दर शनिवारी येथे दीड ते दोन हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. शनिवारी कार्तिक मासातील एकादशी असल्याने भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी आले होते. हे मंदिर पहिल्या मजल्यावर असून, भाविक पायऱ्यांवरून चढत असताना लोखंडी रेलिंग तुटली. त्यामुळे भाविक एकमेकांवर कोसळून ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बहुतांश जण ३५ ते ४० वयोगटातील आहेत, अशी माहिती आंध्र प्रदेशचे गृहमंत्री वंगालपुडी अनिथा यांनी दिली.

‘वेंकटेश्वर स्वामी मंदिराचे मालक मुकुंदा पांडा यांनी हे मंदिर बेकायदा पद्धतीने बांधले आहे, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आलेल्या नव्हत्या. आंध्र प्रदेशात नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत मंदिरांमध्ये भाविकांसाठी पोलीस सुरक्षा पुरवली जाते. परंतु मंदिर प्रशासनाने पोलिसांना भाविकांच्या उपस्थितीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती,’ असे जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) के.व्ही. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही रेड्डी म्हणाले.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. ‘आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी दुःखी आहे. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो,’ असे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना २००० रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) आर्थिक मदत जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त केला.