NEET Exam Inspirational Story: पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली नीटची फेरपरीक्षा रविवारी शांततेत पार पडली. किरकोळ गैर प्रकार वगळता सर्व केंद्रांवर यशस्वीरित्या परीक्षा पार पडल्याची माहिती एनटीएने दिली आहे. फेरपरीक्षेबाबत कोलकातामधून एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. भीषण कार अपघातातून बचावलेल्या सृष्टी दुबेने देखील रविवारी ही परीक्षा दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विशेष पुढाकारामुळे सृष्टीसाठी परीक्षा केंद्रावर खास व्यवस्था करण्यात आली.
अपघातानंतर ९ बरगड्या तुटल्या, पण परीक्षा देण्याची जिद्द कायम
१४ जून रोजी झालेल्या अपघातात सृष्टीला गंभीर दुखापत झाली होती. तिच्या छातीच्या ९ बरगड्या तुटल्या होत्या, फुफ्फुसाला गंभीर इजा झाली होती, एका मोठ्या रक्तवाहिन्याची शस्त्रक्रिया देखील तिच्यावर करण्यात आली होती. काही काळ सृष्टीला व्हेंटिलेटर सुद्धा ठेवण्यात आले होते. गंभीर दुखापत आणि वेदना होत असताना देखील सृष्टीने परीक्षा देण्याचा निर्धार केला. परीक्षेसाठी मदत मिळावी म्हणून सृष्टीच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे धाव घेतली. त्यानंतर कोलकाता येथील ढाकुरिया भागातील ‘बिनोदिनी गर्ल्स हायस्कूल’ या परीक्षा केंद्रावर तिच्यासाठी विशेष सोयी-सुविधा करण्यात आल्या.
परीक्षेसाठी विषेश व्यवस्था
समोर आलेल्या माहितीनुसार, सृष्टीला परीक्षा केंद्राच्या तळमजल्यावर एक स्वतंत्र खोली देण्यात आली. तसेच ‘चेस्ट ड्रेन’ यासारख्या वैद्यकीय उपकरणांसह तिला परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. संपूर्ण परीक्षेदरम्यान आयएलएस रुग्णालयातील डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचे एक पथक तिच्या देखभालीसाठी उपस्थित होते, तर केंद्राबाहेर एक रुग्णवाहिका सतत तैनात ठेवण्यात आली होती.
शिक्षण मंत्र्यांनी पालकांशी साधला संवाद
परीक्षेनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः सृष्टीच्या पालकांशी फोनवर संवाद साधला. सृष्टीला परीक्षा देता यावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रधान यांनी दिले होते. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचनेनंतर एनटीए, स्थानिक प्रशासन, डॉक्टर आणि परीक्षा अधिकाऱ्यांनी समन्वय सृष्टीसाठी विशेष व्यवस्था केली होती. दरम्यान, पेपरफुटीनंतर रद्द करण्यात आलेली नीट प्रवेश परीक्षा रविवारी पार पडली. २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिली.
