वडोदरा, गुजरात येथील एसएसजी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग इमारतीत तिघांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आता रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल

​टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एसएसजी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रंजन अय्यर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे”, असे अय्यर म्हणाले. डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या एका रुग्णाबरोबर हे लोक आले असल्याचे डॉ. अय्यर पुढे म्हणाले. नातेवाईक नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला, असेही त्यांनी सांगितले.

रुग्णालयाचे स्पष्टीकरण

​”संबंधित व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत असून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी ओपीडी इमारतीच्या तळमजल्यावर घडली. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक एका रुग्णाचे नातेवाईक असल्याचे समजते असून ते शांततेत प्रार्थना करत होते,” असे डॉ. अय्यर यांनी स्पष्ट केले. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे माहिती अधीक्षकांनी दिल्याचे ​टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

अधीक्षक काय म्हणाले?

दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयाच्या सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असे ​अधीक्षकांनी स्पष्ट केले. “या प्रकारामुळे रुग्णालयाच्या कामकाजात कोणतीही बाधा आली नाही किंवा इतर रुग्ण आणि नातेवाईकांना कोणताही त्रास झाला नाही. सध्या आम्ही या घटनेशी संबंधित तथ्यांची पडताळणी करत आहोत,” असे अधीक्षकांनी सांगितले.