राजस्थानच्या जयपूरमधील खाटूश्यामजी मंदिरामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. काही भाविक जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सिकार परिसरातील या मंदिरामध्ये मासिक जत्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

सकाळी ५ वाजता मंदिर उघडण्यापूर्वीपासूनच परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकाचवेळी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिनही भाविक महिला आहेत. त्यापैकी केवळ एका महिलेची अद्यापर्यंत ओळख पटली आहे.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. घटनेतील जखमींना २० हजारांचे आर्थिक साहाय्य देखील करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांना या घटनेच्या चौकशीचे आदेश गहलोतांनी दिले आहेत.

पारंपरिक चंद्र दिनदर्शिकेनुसार आजचा दिवस खाटूश्यामजी यांच्या दर्शनासाठी शुभ मानला जातो. खाटूश्यामजी भगवान कृष्णाचे अवतार मानले जातात. जयपूरच्या या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेहमीच भाविक मोठी गर्दी करीत असतात.