Andhra Pradesh Temple Stampede: चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा दक्षिण भारत हादरला आहे. आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी भाविकांच्या चेंगराचेंगरीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडू आणि बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

शनिवारी व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्यातच एकादशीच्या मुहूर्तावर अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्सवर याबाबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “या दुःखद घटनेत भाविकांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमींना जलद आणि योग्य उपचार मिळावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य आणि इतर उपाययोजनांवर देखरेख करण्याची विनंती केली आहे.”

काशिबुग्गा व्यंकटेश्वर मंदिर हे १२ एकरवर पसरलेले आहे. दूरदूरून भाविक याठिकाणी दर्शनाला येत असतात. चेंगराचेंगरीनंतर मंदिर परिसरात अनेक भाविक जमिनीवर निपचित पडल्याचे दिसले. इतर भाविकांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच उपचारासाठी तातडीने रुग्णालयात त्यांना हलवले.

अभिनेता विजयच्या रॅलीत झाली होती चेंगराचेंगरी

काही दिवसांपूर्वीच शेजारच्या तमिळनाडू राज्यात अभिनेता आणि आता राजकीय पक्षाचा नेता झालेल्या थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ४१ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनीच आता आंध्रात ही दुःखद घटना घडली आहे.

वर्षभरातील राज्यातील तिसरी घटना

व्यकंटेश्वर मंदिरात झालेली चेंगराचेंगरीची घटना या वर्षातील राज्यातील तिसरी घटना आहे. ३० एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथील सिंहचलम मंदिरात पावसामुळे भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. ८ जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या विशेष दर्शनासाठी तिकिटे वाटप करण्यासाठी काउंटवर झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता.

आरसीबीच्या सत्कार सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरी

‘इंडियन प्रीमियर लीग’चे (आयपीएल) जेतेपद पटकावल्यानंतर जून महिन्यात ‘आरसीबी’ संघातील खेळाडूंच्या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने चिन्नास्वामी क्रीडांगणात केले होते. या वेळी क्रीडांगणाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५६ जण जखमी झाले.

पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील व्यंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या वारशांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.