शिक्षक दिनापूर्वी राज्यांनी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करा!

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राज्यांना दिले आहेत.

शिक्षक दिनापूर्वी राज्यांनी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करा!
या महिन्यात राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त करोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राज्यांना दिले आहेत.

“या महिन्यात प्रत्येक राज्याला ठराविक लसीचा ठराविक पुरवठा करण्यात येईल. याशिवाय २ कोटींपेक्षा अधिक डोस जास्तीचे पुरवण्यात येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्याचा प्रयत्न करा,” असं मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२०मध्ये देशव्यापी लॉकडाउन लावण्यात आले होते. त्याच्या काही दिवस आधीपासूनच देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती. अनेक राज्यांनी शाळा अंशतः पुन्हा सुरू करण्यास सुरुवात केली असतानाच एप्रिल महिन्यात करोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे शाळा पुन्हा पुर्णपणे बंद करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून शाळा-महाविद्यालये ऑनलाइन सुरू आहेत.

देशातील करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. रुग्णसंख्या देखील कमी झाली असून केरळ वगळता इतर राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी शाळा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू होत असल्या तरी लसीअभावी अनेक शिक्षकांचं लसीकरण रखडलं आहे. त्यामुळे शिक्षकांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला आहे, त्यातच करोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या भागात सरकारने शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुलं आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: States asked to vaccinate all school teachers on priority before teachers day hrc