Statue of Liberty Collapse : ब्राझीलच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्वायबा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्राझीलमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही सेकंदात कोसळला आहे. ही घटना घडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ब्राझीलच्या हवन मेगास्टोअरच्या बाहेर हा स्टॅच्यू होता.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हवन मेगास्टोअरच्या बाहेर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची २४ मीटर उंचीची प्रतिकृती होती. मात्र, दक्षिण ब्राझीलमध्ये शक्तिशाली वादळ आल्याने ही घटना घडली. ही घटना घडली तेव्हा येथील वाऱ्याने ९० किमी/ताशी वेग ओलांडला होता अशी माहिती सांगण्यात आली आहे.

हा स्टॅच्यू २०२० मध्ये स्थापन करण्यात आला होता. तसेच हा स्टॅच्यू कोसळण्यापूर्वी काही क्षण आधी स्टॅच्यूच्या आसपास आसणारे वाहने लोकांकडून बाजूला काढण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही दुखापत किंवा कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झालं नाही. हा स्टॅच्यू कोसळल्यानंतर ग्वायबा शहराच्या महापौरांनी घटनेची अपडेट शेअर केली आहे.

ग्वायबा शहराच्या महापौरांनी म्हटलं की, ८० ते ९० किमी/ताशी वेगाने वारे वाहू लागले, त्यामुळे ही घटना घडली. ही घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा प्रोटोकॉलनुसार परिसर ताबडतोब मोकळा केला आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.

२०२१ मध्येही असाच एक स्टॅच्यू कोसळला होता

ब्राझीलच्या ग्वायबा शहरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे स्टॅच्यू काही सेकंदात कोसळला आहे. मात्र, याआधी २०२१ मध्येही असाच एक स्टॅच्यू कोसळला होता. तेव्हाही अशाच प्रकारे ७०-८० किमी/तास वेगाने वारे आले होते आणि त्या चक्रीवादळादरम्यान एक स्टॅच्यू कोसळला होता, ज्यामध्ये काही प्रमाणात नुकसान झालं होतं.