मागील महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची देशभरातल्या अनेक संवेदनशील ठिकाणी विटंबना करण्यात आली. अशा प्रकारे विटंबना टाळण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. देशातील अनेक संवेदनशील भागांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना काही समाजकंटकांकडून करण्यात आली. हे प्रकार टाळायचे असतील आणि समाजकंटकांना पकडायचे असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

फक्त बाबासाहेब आंबेडकरच नाही तर ज्या इतर पुतळ्यांची विटंबना झाली अशा महापुरुषांच्या पुतळ्यासमोरही सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत असे आठवले यांनी म्हटले आहे. रत्नागिरीतल्या खेड मध्ये ते बोलत होते. खेडमध्येही काही दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांची गेल्या काही दिवसांमध्ये विटंबना करण्यात आली. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत शरमेची बाब आहे. या पुतळ्यांची विटंबना थांबवायची असेल सीसीटीव्ही कॅमेरे लावावेच लागतील. पुतळ्याची विटंबना झाली की त्या ठिकाणी हिंसाचार वाढतो. समाजकंटकांना हेच हवे असते. हे सगळे टाळायचे असेल तर हा उपाय आहे. आपण लवकरच केंद्राकडे या संदर्भातली मागणी करणार आहोत असेही आठवलेंनी म्हटले आहे.