अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल्टर रीड रुग्णालयामध्ये २०१९ साली गुप्तपणे दौरा केला होता. ट्रम्प हे या ठिकाणी आपल्या कोलोनोस्कॉपीसाठी गेले होते. ट्रम्प यांच्या माजी सेक्रेटरी आणि मेलेनिया ट्रम्प यांच्या माजी चीफ ऑफ स्टाफ राहिलेल्या स्टेफनी ग्राशम यांनी हा खुलासा केलाय. स्टेफनी यांनी आपल्या नवीन पुस्तकामध्ये ट्रम्प यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केल्याने हे पुस्तक सध्या चर्चेत आहे.

पुस्तकाचे नाव काय आणि कोणी दिलंय वृत्त?
‘आय वील टेक युआर क्वेश्चन नाउ’ या आपल्या पुस्तकामध्ये स्टेफनी यांनी अनेक धक्कादायक दावे केल्याचं सीएनएनने म्हटलं आहे. या पुस्तकाची प्रत सीएनएनच्या हाती लागली असून यावर आधारित वृत्तानुसार या पुस्तकामध्ये स्टेफनी यांच्यासमोर व्हाइट हाऊसमध्ये घडलेल्या घटनाक्रमांसंदर्भात यामध्ये भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये ट्रम्प प्रशासनाच्या काळात करण्यात आलेल्या खोट्या दाव्यांचाही उल्लेख असल्याचं सीएनएनने म्हटलं आहे.

उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार देण्यास नकार
स्टेफनी यांच्या पुस्तकामध्ये कॉलोनोस्कॉपीचा उल्लेख थेट केलेला नसला तरी त्यांनी ट्रम्प यांनी वॉल्टर रीड रुग्णालयाचा दौरा केल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या आरोग्यासंदर्भात मागील बऱ्याच काळापासून चर्चा सुरु असून त्यावर या दाव्यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे. अशाप्रकारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनीही उपचार करुन घेतल्याचा उल्लेख स्टेफनी यांनी केलाय. आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे देशाचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांच्याकडे देण्यासाठी ट्रम्प तयार नव्हते. त्यामुळेच त्यांनी आपल्या या रुग्णालयाच्या दौऱ्यासंदर्भात फार कोणाला कळू दिलं नसल्याचं स्टेफनी सांगतात.

कोलोनोस्कोपी म्हणजे काय?
आतड्यांसंदर्भातील समस्या, पोटदुखी, शरीरातून रक्त पडणे, बद्धकोष्ठता, अतिसार यासारख्या गोष्टींची चाचणी कोलोनोस्कोपीमध्ये केली जाते. यामध्ये यामध्ये चार फूट लांबीची लवचिक ट्यूब व्यक्तीच्या गुदद्वारातून शरीरात टाकून आतड्यांची तपासणी केली जाते.

मेलेनिया दूर राहण्याचा प्रयत्न करायच्या
स्टेफनी यांनी केलेल्या दाव्यानुसार पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स आणि कॅरन मॅकडॉगलसोबतच्या नात्यांबद्दल खुलासा झाल्यानंतरचा काळ ट्रम्प यांच्यासाठी फार कठीण गेला. ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया या सुद्धा या प्रकरणानंतर पतीवर चांगल्याच संतापल्या होत्या. या प्रकरणानंतर मेलेनिया डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करताना जाणवायचं असं स्टेफनी यांनी म्हटलं आहे.

पुरुषत्वाबद्दल शंका उपस्थित केल्यानंतर…
ट्रम्प आणि डेनियल्स यांच्यातील नात्याबद्दल खुलासा झाल्यानंतर आपल्याला अपमान सहन करावा लागल्याचं स्टेफनी यांनी म्हटलं आहे. स्टेफनी यांनी केलेल्या दाव्यानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांनी एअरफोर्स वनमध्ये बोलवून आपल्या पुरुषत्वाबद्दल सांगितलं होतं.
“पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्सने ट्रम्प यांच्या पुरुषत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतरच त्यांनी आपल्याला पुरुषत्वाबद्दल सांगितलं होतं. मी केवळ ओके असं उत्तर त्यांना दिलं. मला त्यावेळी तिथून लवकरात लवकर निघायचं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा ओरडून तेच सांगितलं. त्यावर मी फार नम्रपणे होय असं म्हटलं. मात्र हे सर्व फार विचित्र होतं,” असं उल्लेख स्टेफनी यांनी केल्याचं सीएननच्या वृत्तात म्हटलं आहे.

स्टेफनीच्या प्रियकराला सेक्स लाइफबद्दल विचारलं होतं
एकदा ट्रम्प यांनी स्टेफनी यांच्या प्रियकराला त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल म्हणजेच सेक्स लाइफबद्दल विचारलं होतं, असंही या पुस्तकात म्हटलं आहे. स्टेफनी यांचा प्रियकर त्यावेळी ट्रम्प यांचा खास नियुक्त अधिकारी होता. तसेच एका पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प अनेकदा एका महिला रिपोर्टरबद्दल विचारत होते. त्यानंतर त्यांनी या महिलेला एअरफोर्स वनच्या त्यांच्या केबिनमध्ये घेऊन येण्यास सांगितलं होतं. ट्रम्प यांना त्या तरुणीला पाहायचं होतं, असं स्टेफनी यांनी म्हटलं आहे.

हेअरस्टाइलबद्दलही खुलासा…
ट्रम्प यांच्या हेअरस्टाइलबद्दलही स्टेफनी यांनी खुलासा केलाय. ट्रम्प हे त्यांचे केस स्वत: ट्रीम करायचे. त्यांच्याकडे केस कापण्यासाठी अनेक कात्र्या होत्या असं स्टेफनीने या पुस्तकात म्हटलंय.

पुतीन भेटीदरम्यान केलं नाटक…
याच पुस्तकामध्ये ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी नाटक केल्याचा दावाही स्टेफनीनं केलंय. २०१९ च्या जी २० बैठकीच्या वेळी प्रसारमाध्यमांसमोर ट्रम्प यांनी पुतिन यांच्याविरोधात कठोर भूमिका घेण्याचा अभिनय केला होता. त्यावेळी कॅमेरा सुरु होणार होते त्याआधी ट्रम्प यांनी, “मी आता काही वेळ तुमच्याविरोधात बोलेले, हे केवळ कॅमेरांसाठी आहे,” असं पुतिन यांना सांगितल्याचं दावा स्टेफनीने केलाय.

ट्रम्प कुटुंबियांकडून टीका…
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी या पुस्तकातील खुलासे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचा दावा केलाय. ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी हे पुस्तक म्हणजे ट्रम्प कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा एक प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. मेलेनिया ट्रम्प यांच्या कार्यालयानेही या पुस्तकावरुन स्टेफनी यांच्यावर टीका केलीय.