गेल्या काही दिवसांपासून ‘एपस्टीन फाईल्स’ची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या कागदपत्रांमध्ये जगभरातील अनेक नामांकित लोकांची नावे समोर आली आहेत. यादरम्यान जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे जेफ्री एपस्टीन फाईलमधील एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये हॉकिंग हे बिकिनी परिधान केलेल्या दोन महिलांच्यामध्ये बसलेले दिसत आहेत. या फोटोबाबत हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले असून त्या महिला दीर्घ काळापासून हॉकिंग यांची काळजी घेत होत्या, असे सांगण्यात आले आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हॉकिंग हे एका निळ्या रंगाच्या लाउंज खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो पूल साईड किंवा रिसॉर्टसारख्या एखाद्या ठिकाणी काढल्याचे दिस असून स्मितहास्य करत असलेल्या हॉकिंग यांच्या हातात फळांनी सजवलेले एक लाल रंगाचे कॉकटेल दिसून येत आहे.
मात्र लौगिंग गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रांमध्ये हा फोटो कधी आणि कोणत्या प्रसंगी काढण्यात आला याबद्दल स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हॉकिंग यांच्या कुटुंबाने हा फोटो कॅरेबियन आयलंड ऑफ सेंट थॉमसवरील रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये २००६ साली काढण्यात आला होता असे म्हटले आहे. येथे हॉकिंग यांनी क्वांटम कॉस्मॉलॉजीवर भाषण दिले होते.
हॉकिंग यांच्या एका प्रतिनिधीने यूकेच्या डेली मेलशी बोलताना सांगितले की, त्या दोन महिला या यूकेमधील होत्या आणि त्या हॉकिंग यांची दीर्घ काळापासून काळजी घेत होत्या. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, त्यांच्या बाजूने कोणत्याही अयोग्य वर्तनाचा शंका उपस्थित करणे चुकीचे आणि अत्यंत अतिरंजित आहे.
सेंट थॉमस बेटावरील कार्यक्रम हा एपस्टीनने आयोजित केला होता, ज्यामध्ये हॉकिंग यांच्याबरोबच जागतिक पातळीवरील २१ प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी मार्च २००६ मध्ये आयोजित केलेल्या परिषदेत भाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे एपस्टीनवर वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा पहिला आरोप होण्याच्या पाच महिने आधी ही परिषद पार पडली होती.
अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या एपस्टीन संबंधित कागदपत्रांमध्ये हॉकिंग यांचे नावे अनेकदा आले आहे. यामध्ये न्यायालयाची कादगपत्रे, कम्युनिकेशन रेकॉर्ड्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि एपस्टीनशी संबंधित इतर अनेक कागदपत्रांचाही समावेश आहे. हॉकिंग यांचे २०१८ साली वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
एक महत्त्वाचा संदर्भ हा जानेवारी २०१५ साली जेफ्री एपस्टीनने त्याची सहकारी Ghislaine मॅक्सवेलला पाठवलेल्या ईमेलमध्ये समोर आला होता. ज्यामध्ये एपस्टीनने व्हर्जिन आयलंडवरील एका underage orgy मध्ये हॉकिंग यांनी सहभाग घेतला होता अशा एका दाव्याचा उल्लेख केला होता. त्याने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते आणि असे कधीही घडले नाही हे सिद्ध करण्यासाठी तो पुरावे शोधत असल्याचे नमूद केले होते.
२०१५ मधील दुसऱ्या एका फोटोमध्ये हॉकिंग त्यांच्या व्हीलचेअरवर एका बार्बेक्यूसाठी गेल्याचे दिसून आले होते. एका प्रसंगी, त्यांना एपस्टीनच्या बेटाभोवतीच्या समुद्रात ‘सबमरीन टूर’ घडवून आणल्याचे सांगण्यात येते. याच बेटावरून तो लैंगिक गुन्हेगार एपस्टीन हा आपले बेकायदेशीर धंदे चालवत असल्याचा आरोप आहे.

