पीटीआय, नवी दिल्ली

इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या भारतीयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय तयारी करत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली. सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी नागरी तसेच लष्करी वाहतूक विमानांचा वापर करण्याच्या पर्यायावरही विचार करत असल्याचे समजते.

इराणमधील देशव्यापी आंदोलनांवर केलेल्या कारवाईमुळे अमेरिकेने लष्करी कारवाईची शक्यता नाकारलेली नाही. सध्या इराणमध्ये विद्यार्थ्यांसह सुमारा १० हजारहून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने बुधवारी इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांना उपलब्ध साधनांद्वारे देश सोडण्याचे आणि इराणचा कोणताही प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटकांसह सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध वाहतूक साधनांद्वारे इराण सोडण्याचे आवाहन केले. तसेच, सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना योग्य ती खबरदारी घेण्याचे, आंदोलने किंवा निदर्शने होणारे भाग टाळण्याचे आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू इराणचे चलन ‘रियाल’ विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरीस तेहरानमध्ये आंदोलने सुरू झाली होती. ही निदर्शने आता सर्व ३१ प्रांतांमध्ये पसरली असून, आर्थिक समस्यांविरुद्ध सुरू झालेल्या या आंदोलनाचे रूपांतर आता राजकीय बदलाच्या मागणीत झाले आहे. वृत्तांनुसार, इराणमधील या देशव्यापी आंदोलनांमध्ये आतापर्यंत २,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.