काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांविरोधातील एफआयआर मागे घेण्याऐवजी त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं वक्तव्य भाजपा आमदार डी पी वत्स यांनी केलं आहे. ‘मी नुकतंच दगडफेक करणाऱ्यांविरोधातील एफआयआर मागे घेतले जात असल्याची बातमी वाचली. पण मला वाटतं दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत’, असं डी पी वत्स यांनी म्हटलं आहे.

वत्स काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारच्या निर्णयावर बोलत होते. फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने दगडफेक करणाऱ्या १० हजार जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच दगडफेक करणाऱ्यांविरोधात एफआयआर मागे घेण्याचं वक्तव्य केल्यानंतर वत्स यांचं हे वक्तव्य आलं आहे. राजनाथ सिंह यांनी मुलं चुका करत असतात, त्याचं भविष्य अंधारात जाऊ नये असं म्हटलं होतं.

‘पहिल्यांदाच दगडफेक करणाऱ्या १० हजार तरुणांविरोधातील एफआयआर आम्ही मागे घेत आहोत, कारण हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे’, असं राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीर दौऱ्यावेळी म्हटलं होतं.

याआधी केंद्र सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे, जम्मू काश्मीर सरकारने दगडफेक करणाऱ्यांविरोधात एफआयआर मागे घेण्याचा घेतलेला निर्णय सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करेल तसंच दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी सामान्य नागरिकांचा ढाल म्हणून वापर करण्याला प्रोत्साहन देईल असं मत व्यक्त केलं होतं.

लष्कर अधिकाऱ्याच्या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर एक रिपोर्ट सादर केला होता. यामध्ये केंद्र सरकारने सांगितलं की, ‘दगडफेक करणाऱ्यांविरोधातील गुन्हे राज्य सरकारने मागे घेतल्यास सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची होईल. तसंच दहशतवाद्यांना सामान्य नागरिकांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करण्यास प्रोत्साहन देईल’.